iDainik.com

Your Own Digital Platform

Satara

Sports

शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेने करा : उदयनराजे भोसलेस्थैर्य, पुणे: 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कुणीही गाठू शकणार नाही, मात्र अलिकडे 'जाणता राजा' ही उपमाही दिली जाते. मी याचाही निषेध करतो. जनता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत. त्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही, अशी टीका भाजपचे नेते, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली. या वेळी उदयनराजे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडले.

'पुस्तकामुळे वाईट वाटले'

गोयल नावाच्या कुण्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी ते वाचलेले नाही. वास्तविक या जगात महाराजांच्या उंचीपर्यंत कुणीही जाऊ शकणार नाही. एक युगपुरूष कधीतरी जन्माला येतो. ते म्हणजे शिवाजीराजे. तुलना करणाऱ्या लोकांची बुद्धी गहाण ठेवली आहे का?, असा सवाल करत तुलना करणाऱ्या या पुस्तकामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच या तुलनेमुळे वाईट वाटल्याचेही ते म्हणाले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं तर सोडाच, पण त्यांच्या आसपासही कुणी जाऊ शकणार नाही. प्रत्येकजण महाराजांचे चरित्र वाचतो. आपण अनुकरण करू शकतो. विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. पण शिवाजी महाराज कुणीही बनू शकणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. युगपुरुष फक्त एकदाच जन्माला येतो. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरूष आहेत. त्यांची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही. जाणता राजा फक्त शिवाजी महाराज आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" पुस्तकावर बोलत असतानाच उदयनराजे यांनी 'जाणता राजा' या उपमेवरही भाष्य केले. या वेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. शिवस्मारक, आरक्षणासारखे प्रश्न जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी प्रलंबित का ठेवले, असा सवालही या वेळी उदयनराजे यांनी केला आहे.
 
शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारून शिवसेना हे नाव ठेवलं का : उदयनराजेंचा सवाल 

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यायोग्य व्यक्ती भारतातच काय पण जगातही नाही असं वक्तव्य शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर जगात फक्त एकच जाणता राजा आहे. जे लोक जाणता राजा म्हणून कुणालाही उपमा देतात त्याचा मी निषेध करतो असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं.
 
शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या व्यक्तींचाही मी निषेध करतो. जेव्हा तुम्ही शिवसेना हे नाव ठेवलं तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?
 
शिवाजी महाराजांनी कुणाशीही भेदभाव केला नाही. मी तुमच्यापेक्षा कणभर जास्त पुण्य केलं असेल म्हणून मी शिवाजी महाराजांच्या वंशात जन्मलो, पण तुम्ही सर्व जण शिवाजी महाराजांची एक्सटेंडेट फॅमिली आहेत, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
 
शिवाजी महाराजांची शिकवण ही सर्वधर्मसमभावाची आहे. त्या शिवकणीचा विसर तुम्हाला पडला का? असा सवाल उदयनराजेंनी केला. कुणीही येतं आणि छत्रपतींच्या वंशजांबद्दल उद्गार काढतं. हे खपवून घेतलं जाणार नाही असं उदयनराजे यांनी सांगितलं.
 
तुम्ही राजेशाही घालवून लोकशाही आणली पण काय मिळवलं तुम्ही. या लोकांकडे इतकी संपत्ती कुठून आली हा प्रश्न जनतेनी विचारायला हवा. आज राजेशाही असती तर कुणीच उपाशी राहिलं नसतं ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. लोकशाहीत जनता हीच राजा असते, असं उदयनराजे भोसले.
 
ज्या लोकांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन दंगली घडवल्या त्यांना जनतेनं जाब विचारावा असं उदयनराजे म्हणाले. शिवाजी महाराजांचं नाव घेणार असाल तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागा. शिवाजी महाराज हे आमच्या कुटुंबाचे नाहीत तुमचे पण आहेत. ही माझी एकट्याचीच जबाबदारी नाही. तुम्ही सर्व जण शिवाजी महाराजांचे वारसच आहात.
 
हा विषय संवेदनशील आहे. आजपर्यंत फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून सध्या राज्यासह देशातील वातावरण तापले आहे. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा संतप्त सवाल उदयन राजेंनी विचारला. तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशी विचारणा करत उदयनराजेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली. तसेच शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
 
''आज के शिवाजी नरेंद्र मोदी'' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेला टीकेचे अधिक लक्ष्य केले. ते म्हणाले की,'' मुंबईला असलेल्या शिवसेना भवनात बाळासाहेबांच्या फोटोखाली शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यावर शिवसेनेने उत्तर दिले पाहिजे. शिवरायांचे वंशज म्हणून आमच्यावर टीका केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. पण सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही काही जणांची लायकी आहे. शिवसेनेकडून शिववडा नावाचा वडापाव सुरू करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. खरंतर शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना केले पाहिजे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.

पानिपतचा होमकुंड असाच जागता ठेवा- विश्वास पाटील


स्थैर्य, सातारा : पानिपत या ठिकाणी १४जानेवारी १७६१ला झालेल्या युद्धासारखं दुसरं रणमैदान झालंच नाही .महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावातून या युद्धात लढणारे वीर होते .परंतु कण्हेरखेड सारखं दुसरं गाव नाही . या गावातील अनेक वीर या युद्धात हुतात्मा झाले . यामुळे या गावाने पानिपत चा होमकुंड असाच जागता ठेवा .असे प्रतिपादन विश्वास पाटील यांनी केले.

कण्हेरखेड ता.कोरेगाव येथे पानिपतचा रणसंग्रामाला २५९ वर्ष झाली. या स्मृती जागवण्यासाठी ,या युद्धात हुतात्मा झालेल्या विर योद्ध्यांचा पराक्रम पुढच्या पिढीला कळावा यासाठी पानिपत शौर्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस निरीक्षक धीरज पाटील ,कोंडाजी फर्जद यांची भूमिका केलेले आनंद काळे , सभापती राजाभाऊ जगदाळे, रणजित गरुड , शिवाजीराव शिंदे , सरदार मिस्त्रीकर, हर्ष राज शिंदे , संजय पाटील शिरोळकर , प्रा पांडुरंग शिंदे ,अर्जुन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

बोलताना पुढे ते म्हणाले, पानिपतची लढाई हिंदुस्तान रक्षणाकरता झालेली लढाई आहे. सर्व जाती धर्म पंथ या लढाईत लढत होते फक्त मराठा धर्म म्हणूनच .आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य वाढावे यासाठीच . याच दिवशी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही बाजुकडील त दीड लाख माणसं , जवळपास ऐंशी हजार जनावरे मृत्युमुखी पडले .असा संहार जगाच्या पाठीवर कुठेही झाला नव्हता .जवळपास तीन आठवडे अन्न पाण्यावाचून हाल झालेल्या भाऊ पेशव्यांच्या सैन्याला बाहेरून कोणतीच मदत मिळाली नाही .झाडपाला खाऊन सैन्य लढाई करत होते आणि त्यात निसर्गाची हि साथ मिळाली नाही .या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला ,तरीही भविष्य जिंकले .युद्ध जिंकूनही अब्दुलशहा अब्दाली मराठ्यांच्या लढवय्यी पणाचे कौतुक करून गेला मराठ्यांची पराक्रमाची गाथा अजरामर करून गेला .पानिपतचे युद्ध हरल्यानंतर याच मातीतील महादजी शिंदे यांनी परत एकदा दिल्लीवर मराठ्यांचा झेंडा फडकवला व या युद्धास कारणीभूत असणाऱ्या नजीबखानाची कबर उकरून टाकली होती. हा इतिहास या गावचा आहे .

कार्यक्रमाची सुरवात शहिदांच्या स्मरणार्थ उभ्या असलेल्या सोळा खांबी स्मारक व चार खांबी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली .पानिपतवरून तिथल्या मातीचा कलश सध्या पानिपत परिसरात राहत असलेल्या मराठ्यांनी आणला होता. तो कलश कण्हेरखेड चे सरपंच संजय शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला .मावळा प्रतिष्ठान अतित च्या कार्यकर्त्यांनी तलवार दांडपट्टा लाठीकाठी च्या चित्तथरारक कसरती केल्या .पियुषा भोसले या मुलीने संभाजी महाराजावर पोवाडा म्हणून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक गावातील शिंदे कुटुंबीय सहकुटुंब उपस्थित होते .प्रस्ताविक डॉक्टर संग्राम शिंदे आभार अॅड . विजय शिंदे यांनी मानले.

मुंबईत चणे फुटाणे विकून शिक्षण घेणाऱ्या माणदेशी संतोषला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून दिलासा


सामाजिक न्याय विभागाला मदत करण्याचे निर्देश

स्थैर्य, मुंबई : मुंबईत चणे -फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या धडपड्या संतोष साबळे याला आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल असा दिलासा दिला. त्यासाठी त्यांनी सामाजिक न्याय विभागालाही मदत करण्याचे निर्देश दिले.

सातारा आणि सांगली जिल्हाच्या सीमेवर आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे रात्री दहा ते पहाटे पाच वेळेत चौपाटीवर चणे फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करतो. त्याचे स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. मुंबईत येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संतोष साबळे याची बातमी प्रसिद्ध झाली होती. संतोष खूप गरीब असून दिवसा तो कलिना येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करतो आणि सायंकाळनंतर मरिन लाईन्स आणि गिरगाव चौपाटी येथे शेंगदाणे विकतो
या बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संतोषशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आपला रात्रीचा नित्यक्रम संपवून विद्यापिठात जाणाऱ्या संतोषला मंत्रालयात येण्यासाठी संदेश देण्यात आला.
मंत्रालयात मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी संतोषची आस्थेने चौकशी केली. त्याची माहिती घेतानाच शिक्षणाच्या धडपडीचे कौतुक केले. "शिक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर, त्यासाठी तुला लागेल ती मदत केली जाईल,"असा दिलासा दिला. त्यासोबतच संतोषला कोणत्या प्रकारे मदत करता येतील याची माहिती घेऊन, त्याला अभ्यासासाठी तातडीने सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.

भारावलेल्या संतोषने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वत: दखल घेऊन आपली आस्थेने चौकशी केल्याबद्दल आभार मानले. यातून प्रेरणा घेऊन आणखी जोमाने शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त कात्रेश्वर हायस्कुलमध्ये विविध कार्यक्रम

कातरखटाव - स्वामी विवेकानंद जयंती निमित्त काढलेली मिरवणुक

स्थैर्य, कातरखटाव : स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त येथील श्री कात्रेश्वर हायस्कुल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक दशरथ लोहार यांनी दिली.
आठवडाभर चालणाऱ्या सप्ताहाची सुरुवात आज स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढुन करण्यात आली असून कब्बडी स्पर्धा, खो-खो स्पर्धा, फनि गेम्स आदी स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे.
आज मिरवणुकीवेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी वेशभूषा, रंगभुषा केली. चित्ररथ, लेझीम, झांजपथक, आदी खेळाच्या प्रत्यक्षिकाबरोबरच मिरवणुकीची शोभा वाढवली. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, विठृठल, रुक्मीणी, ज्ञानेश्वर, मुक्ताई, स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांची वेषभुषा केलेले विद्यार्थी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय खोत, सुहास शिंगाडे,अमर भागवत, विजय हांगे आदींसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

खटाव तालुक्यातील वीस सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध : उमेश उंबरदंड


स्थैर्य, कातरखटाव : खटाव तालुक्यातील "ड " वर्गातील वीस उद्योग व मजूर सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदारांची यादी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक उमेश उंबरदंड यांनी दिली.
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या संस्थामध्ये माऊली बहू उद्देशीय निमसोड, संकल्प बहू उद्देशीय वडूज, तुळजाभवानी बहू उद्देशीय पुसेगाव,गणराज बहू उद्देशीय, पुसेगाव, धनश्री सेंद्रिय शेतीमाल वर्धनगड, संकल्प स्वयं रोजगार वडूज,संगमेश्वरा सहकारी संस्था वडूज या उद्योग सहकारी संस्थांचा तर केदार भूषणगड, जोतिबा उंबर्डे, महालक्ष्मी कुरोली, माऊली निमसोड, श्रीराम वडूज, महात्मा फुले कटगुण, निनाई भुरकवडी, कमळेश्वर विखळे, सिद्धिविनायक वडूज,सावता माळी येरलवाडी, जानुबाई हिंगणे,बसव आण्णा वडूज, तुळजाभवानी शेणवडी या मजूर संस्थांचा समावेश असून यावर कोणाच्या हरकती आक्षेप असल्यास २० जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल कराव्यात असे आवाहन उंबरदण्ड यांनी केले आहे.