Your Own Digital Platform

कृषिपंपधारकांकडे २१६ कोटींची थकबाकी : बिल न भरल्यास वीजपुरवठा होणार खंडित


सातारा : महावितरणच्या सातारा मंडलातील कृषिपंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता जे कृषिपंपधारक चालू बिले भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार १६९ कृषिपंप ग्राहकांकडे २१६ कोटी ७ लाख रुपये थकबाकी आहे.
कृषिपंपधारक वीजग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वीज क्षेत्रामध्ये उधारीचे दिवस संपुष्टात आले असल्याने वीजबिलांची वसुली होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्या दृष्टीनेच आता कृषिपंप ग्राहकांच्या वीजबिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेर आकारण्यात आलेली चालू बिले अर्थात दोन त्रैमासिक बिले कृषिपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.

सातारा जिल्ह्यात कृषिपंपधारकांची वीजदेयक वसुली मोहीम कठोरपणे राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार १६९ ग्राहकांकडे २१६ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार कृषिपंपधारक वीजग्राहकांनी वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याकरिता दोन त्रैमासिक वीजबिलांची रक्कम त्वरित भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कॅपॅसिटर बसवले तरच रोहित्र बदलून मिळणार
जिल्ह्यातील वीजबिलांची थकबाकी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने कृषिपंप ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करुन त्वरित वीजबिल भरावे. कृषिपंप वीजग्राहकांचे रोहित्र जळाल्यास अथवा बंद पडल्यास ते दुरुस्त करण्यापूर्वी संबंधित कृषिपंप वीजग्राहकांनी कृषिपंपावर योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसवला आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतरच नवीन रोहित्र देण्यात येईल.
- नागनाथ इरवाडकर, मुख्य अभियंताकृषिपंपांची तालुकानिहाय थकबाकी
तालुका ग्राहकांची संख्या रक्कम (कोटी रुपये)
कराड २०,५७९ २१.२१

पाटण २,०१० १.४७

खंडाळा ९,४३३ ९.८५

फलटण २२,४३२ ४०.५३

सातारा १५,१५३ २६.५७

कोरेगाव २१,६१३ ३२.०५

खटाव २६,९३८ ४०.४७

माण १७,५५४ ३५.१४
वाई १०,०२५ ७.३२

जावळी २,३४५ १.२८

महाबळेश्वर १,०८७ ०.१८

-----------------------------------------------------
सातारा जिल्हा १,४९,१६९ २१६.०