Your Own Digital Platform

कृषी प्रदर्शनात देशी गव्हाच्या बीजोत्पादनाचे धडे
कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समिती व स्मार्ट एक्स्पो ग्रुपने शासनाच्या सर्वोतपरी सहाकार्याने आखलेल्या 14 व्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगीक व पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कुदरत कृषी संशोधन संस्थेचे प्रकाशसिंग रघुवंशी शेतकर्‍यांना मोफत मार्गदर्शन करणार आहेत.

अपनी खेती अपना खाद, अपना बीज अपना स्वाद हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत रघुवंशी हे वाराणसी येथील कुदरत कृषी संशोधन संस्थेत देशी बियाणे विकसित करतात. आतापर्यंत त्यांनी शंभराहून अधिक भरघोस उत्पादन घेणार्‍या देशी वाणांची निर्मिती केली आहे. वाराणसी जिल्ह्यातील टडिया गावचे रहिवाशी असलेल्या रघुवंशी यांची उत्तरप्रदेशात किसानबाबा म्हणून ओळख आहे. गरिबी, भूकबळी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी बीजोत्पादनात क्रांती केली आहे. त्यांनी आतापर्यंत गहू, तूर, भात या पिकांसह अन्य अनेक वाण विकसित केले आहेत.

बिकट अर्थिक परिस्थितीतही विविध बियाण्यांच्या वाणांची बियाणे बँक त्यांनी तयार केली आहे. त्यांनी आतापर्यंत 80 बियाण्यांच्या जाती विकसित केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी देशातील लाखभर शेतकर्‍यांंना मोफत बियाण्याचे वाटप केले आहे. ते कराडच्या कृषी प्रदर्शनामध्ये कुदरत 9 या गव्हाच्या पिकातील बीजोउत्पादनाचे धडे शेतकर्‍यांसमोर गिरवणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासाठी आयोजकांनी तयार केलेल्या दालनामध्ये भेट देणार्‍या व माहिती घेणार्‍या शेतकर्‍यांना ते प्रति शंभर ग्रॅमप्रमाणे 3 हजार बियाणे पाकिटांचे मोफत वाटप करणातर आहेत. कुदरत-9 हे गव्हाचे देशी बियाणे आहे. त्यावर कोणताही रोग येत नाही. तिच्या लोंबीची लांबी 10 इंचापर्यंत राहते. एक एकरामध्ये 32 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. शेतकऱयांना बियाणेविक्रीतून घरबसल्या अर्थाजनाची संधी मिळू शकते. त्यासाठी प्रति शंभर ग्रॅमप्रमाणे 3 हजार पाकिटांचे वाटप करणार असल्याचे त्यांनी कळवले आहे. मिळणार्‍या शंभर ग्रॅम बियाण्यापासून शेतकरी 15 किलो बियाणे उत्पादीत करु शकतात.