Your Own Digital Platform

‘लागीर’ ने घराघरांत पोहोचवलेकराड : संपूर्ण ग्रामीण ढाचा, ग्रामीण संवाद आणि ग्रामीण वातावरणाचा बेस असणार्‍या झी मराठीच्या ‘लागीर झालं जी’ने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतील नायक, नायिकेइतक्याच महत्वपूर्ण व लक्षवेधी भूमिका ठरलेल्या नायकाच्या आजीची भूमिका साकारणार्‍या‘जिजी’ ऊर्फ कमल ठोके यांनी दै. ‘पुढारी’शी दिलखुलास गप्पा मारताना मला या मालिकेने घराघरात पोहोचवलं असे सांगून एकंदरीत त्यांच्या अभिनय प्रवास उलघडला.

कमल ठोके म्हणाल्या, कराडमध्ये 25 वर्षे शिक्षिका म्हणून काम करत असतानाच अभिनयाचीही आवड होती. त्यामुळे नाटकांमध्ये काम करत होते. त्यानंतर चित्रपटमध्ये छोट्या मोठ्या भूमिका मिळत राहिल्या. त्यामधून अभिनयाची माझी हौस पुरी होत होती. मात्र तरीही मला मोठी संधी मिळावी या प्रतिक्षेत होते. जसजशी माझी अभिनायाची चुणूक दिसू लागली तसतसे माझ्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स येवू लागल्या. त्यामुळे एकंदरीत मी 25 ते 30 मराठी, हिंदी, भोजपूरी चित्रपटात काम केले. नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. मात्र तरीही अभिनेत्री म्हणून मला फार मोठी संधी ‘लागीर झालं’ ने दिली. यामुळे मी घराघरात पोहोचले. मला वेगळी ओळख मिळाली, असेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले.

मालिका व चित्रपटातील फरक सांगताना ठोके म्हणाल्या, चित्रपटामध्ये स्क्रिन मोठा असतो मात्र मालिकांचा स्क्रिन छोटा असतो यामध्ये पाच ते सहा पात्रे असतात. मालिकेमध्ये क्लोज सिन जास्त प्रमाणात असल्याने चेहर्‍यावरील हावभाव महत्वाचे असतात. समोर पात्र नसते. मात्र पात्र आहे असे समजून काम करावे लागते. त्यामुळे मालिकेचे काम करणे आव्हानात्मक असते. मालिका पहात असताना प्रत्येकजण मला त्यांच्या घरातील सदस्यांच्या रूपात पहात असतो. त्यामुळे ऑन स्क्रिन, ऑफ स्क्रिन प्रेक्षकांना जिजी एकसारखी वाटते. जिजीची भूमिका लोकांना अपिल झाली. त्यामुळे मी महाराष्ट्राची जिजी झाले याचा मला अभिमान वाटतो.

या वयामध्ये कोणतेही स्ट्रगल न करता मला भूमिका मिळाली. 6 महिन्यात आम्ही रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र रसिकांच्या लक्षात राहात आहे. ही आमच्यासाठी मोठी अ‍ॅचिव्हमेंट आहे. मालिकेचे निर्माते संजय खांबे, श्‍वेता शिंदे तसेच लेखक तेजपाल वाघ यांना यांनी आमच्यावर विश्‍वास टाकला आणि आम्हीही त्याचं सोनं करू शकलो. ही मालिका आमच्या सर्वच कलाकारांच्या आयुष्यातील वाहती गंगा आहे. सर्व कलाकार नवीन असूनही सर्वांना समान संधी देणार्‍या निर्मात्यांचे जिजींनी आभार मानले.