अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक साकारणार: ना. कांबळेसातारा: 2020 साली साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आहे. 2020 सालापर्यंत त्यांचे चिरागनगर (घाटकोपर, मुंबई) येथे सुमारे साडेतीनशे कोटी रुपये किंमतीचे भव्य स्मारक साकारण्याचे काम मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरु झाले आहे, अशी माहिती राज्यमंत्री ना. मधुकर कांबळे यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ना. कांबळे बोलत होते.

ना. कांबळे म्हणाले, गत दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक करण्यासाठी आपण पूर्वीपासून प्रयत्न करत होतो. 2003 साली आण्णाभाऊ साठे यांचे चिरागनगर (घाटकोपर, मुंबई) येथील निवासस्थान आपण विकत घेतले. तेथे स्मारक व्हावे म्हणून आघाडी शासनाकडे आम्ही अनेकदा पाठपुरावा केला होता. पण, मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी सामाजिक न्यायाच्या भावनेतून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. आपण फक्त सामाजिक न्याय आणि समतेची भाषण करत होतो. पण, प्रत्यक्षात ती दिसत नव्हती. सामाजिक न्याय आणि समता हे दोन्ही शब्द फक्त भाषणापुरतेच मर्यादित राहिले होते.

चिरागनगर (घाटकोपर, मुंबई) येथे वास्तव्यास असताना आण्णाभाऊ साठे हे आजारी पडले होते. त्यावेळी त्यांनी स्वत:चे घर शेजारच्यांकडे गहाण ठेवले होते. पण, ते घर आपण परत विकत घेतले. चिरागनगर हा पूर्णत: झोपडपट्टीचा भाग आहे. चिरागनगरच्या मालकाला आपण अमेरीकहून बोलावून घेतले. व त्यांना सांगून तेथे स्मारक उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. आता, खर्‍या अर्थाने सामाजिक न्यायाचा प्रश्‍न सुरु झाला आहे.

महाराष्ट्रात ज्या समाजाने सर्वाधिक फायदे घेतले, असे समाज अधिक आहेत. ते समाज वगळता इतर समाजांना न्याय मिळण्याची भाषा फक्त भाषणातच होते. प्रत्यक्षात काही होत नव्हते. पण, मुख्यमंत्र्यांनी यात पुढाकार घेतला. एव्हाना देशपातळीवरही वंचित समाजांना न्याय कशाप्रकारे देण्यात येईल, यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

चिरागनगर येथील आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारत असताना तेथील 600 लोकांच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. स्मारक उभारत असताना या स्मारकामध्ये स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, कला व नाट्यगृह, वाचनालय अशा अनेक सुविधा वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी पुरविल्या जाणार आहेत, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

No comments

Powered by Blogger.