माहिती अधिकारांचा दुरूपयोग


सातारा : माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सगळीकडेच ऊत आला आहे. जो तो उठतोय तो माहिती अधिकार कार्यकर्ता होवून समाजसेवेचा आव आणू लागला आहे. काहीजण खरोखरच या कायद्याच्या माध्यमातून सामजिक प्रश्‍नांना वाचाफोडण्याचा प्रयत्न करत असले तरी अनेकजण या कायद्याचा दुरूपयोगकरत असल्याचे वांरवार समोर आले आहे. सातारा झेडपीतील माहितीच्या अनुषंगाने तर माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा अजब नमुनाच पेश झाला आहे.

या कार्यकर्त्यांने सदंर्भहिन माहिती मागवून प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. आरटीआय अर्ज की जेवणाची ऑर्डर? असा प्रश्‍न यामुळे उपस्थित झाला आहे. माहिती अधिकार कायद्यामुळे नागरिकांना हवी ती माहिती आता विविध विभागातून मिळू लागली आहे. त्यामुळे अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नाला वाचा फोडली आहे. त्यामुळे शासनाचा हेतू सफल होत असला तरी अलिकडे माहिती अधिकाराचा दुरूपयोग होताना दिसत आहे. राज्य शासनाने आता माहितीचा अधिकार अर्ज ऑनलाईन करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते आता ऑनलाईन अर्ज करताना दिसत आहेत मात्र त्याचाच एक गमतीशीर प्रत्यय शुक्रवारी झेडपीच्या एका विभागात दिसून आला.

संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्यांने यासाठी 10 रूपये फीही भरली आहे. ऑनलाईन अर्जामध्ये संबंधिताने स्मॅकींग अवधी, इंडियन अ‍ॅन्ड चायनीज कझाइन, तंदुर चिली, स्टार्टर्समध्ये अतिश ई आलू, तंदुरी शिकारी तंगडी, मुरगा चीज कबाब अशा चायनीज पदार्थाची माहिती मागवली आहे. हा अर्ज बघून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी चक्रावून गेले. या पदार्थांची नावे वाचताना अधिकार्‍यांच्याही तोंडाला पाणी सुटले.

माहितीच्या अधिकाराखाली ऑनलाईन अर्ज करून प्रशासनाला वेठीस धरण्याचाच हा प्रकार समोर आला आहे. कायद्याचे चांगले शस्त्र असताना त्याचा मात्र दुरूपयोगही अशा प्रकारे केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ऑनलाईन पत्राची वरिष्ठ अधिकार्‍यासह जिल्हा परिषदेमधील कर्मचार्‍यांमध्ये चवीने चर्चा सुरू होती.

No comments

Powered by Blogger.