मटका, जुगार चालविणारे तिघे तडीपारसातारा : वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविणाऱ्या टोळीतील तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. खटाव, माण, कोरेगाव आणि कऱ्हाड या चार तालुक्यांतून त्यांना तडीपार करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविण्यात येत होता. टोळीचा प्रमुख जयवंत बजरंग जाधव (वय ३४), टोळीतील सदस्य मयूर सोपान भोसले (वय ३०) आणि पृथ्वीराज बाळासाहेब चव्हाण (वय ३२, सर्व रा. वडूज, ता. खटाव) अशी त्यांची नावे असल्याचे स्पष्ट झाले होते.

याप्रकरणी त्यांच्यावर वेळोवळी गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्यांना सुधारण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यांचा दिवसेंदिवस जनतेला उपद्रव जाणवत होता. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतूनच होत होती.

या कारणामुळे वडूज पोलिस ठाणे हद्दीत कोणतीही हिंसक घटना घडू नये, दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी टोळीतील तिघांना तडीपार करण्यासाठी वडूज पोलिसांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.

या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक पाटील यांनी जयवंत जाधव, मयूर भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांना खटाव, माण, कोरेगाव आणि कऱ्हाड अशा चार तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार केले. या आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर ४८ तासांच्या आत हद्दीबाहेर गेले पाहिजे. असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.