राणे, तुमची निष्ठा हंगामी : आ. गोरे


खटाव :सत्तेच्या लालसेपोटी आपण वारंवार पक्ष बदलता. आपली निष्ठा हंगामी असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तुमच्यासारख्यांना पुरून उरले आहेत. ज्यांनी मोठे केले त्यांच्याविरोधात बोलण्याची आपली परंपराच आहे. पण, कुणाचा द्वेष करून मोठे होता येत नाही, असे प्रत्युत्तर आ. जयकुमार गोरे यांनी माजी महसूलमंत्री नारायण राणे यांना दिले.

शनिवारी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या हिताचे शेकडो निर्णय घेतले. जलयुक्‍त शिवारसारखी दुष्काळी भागाला वरदान ठरणारी योजना त्यांनीच सुरू केली. सहकार, उद्योग, शेती, सिंचन आणि गरिबांसाठी बाबांनी घेतलेले निर्णय सध्याचे सरकार राबवित आहे. त्यांनी बेकायदेशीर कामांबाबत निर्णय घेतले नाहीत, ही बाब अनेकांना खटकली. आपल्या बाबतीतही असेच झाले असावे म्हणूनच तुम्ही त्यांचा द्वेष करत आहात.

संपूर्ण राज्याला पृथ्वीराज चव्हाण यांचे काम माहीत आहे, म्हणूनच ते आज सध्याच्या सरकारविरोधात ताठ मानेने उभे राहत आहेत. राणे साहेब, आपण तर खूप महान आहात. ज्यांनी मोठे केले त्यांच्याविरोधात बोलण्याची आपली परंपराच आहे. शिवसेनेने तुम्हाला मुख्यमंत्री केले आज तुम्ही उद्धव ठाकरे आणि सेनेच्या विरोधात बोलता. काँग्रेसने तुम्हाला दहा वर्षे कॅबिनेट मंत्रिपद दिले आणि तुम्ही अशोकराव चव्हाण, विखे-पाटील आणि आता पृथ्वीराज चव्हाणांचा सवयीप्रमाणे द्वेष करत आहात. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निर्णयक्षमता नव्हती म्हणता मग त्यांच्याच मंत्रिमंडळात चार वर्षे तुम्ही केलेले काम विसरलात की काय?

पृथ्वीराज चव्हाण यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी ते आजपर्यंत राहुल गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाची आणि जनतेची इमानेइतबारे निष्ठेने सेवा केली आहे. त्यांचे दिल्लीतील प्रामाणिक काम पाहूनच त्यांना राज्याची जबाबदारी दिली होती. आपले मात्र राणेसाहेब सगळेच उलटे आहे. सत्तेच्या लालसेपोटी आपण वारंवार पक्ष बदलता. आपली निष्ठा हंगामी असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पृथ्वीराज चव्हाण तुमच्यासारख्यांना पुरून उरले म्हणूनच तुम्ही त्यांचा द्वेष करत आहात.

कोलांट्या घेणार्‍यांनी चव्हाण यांच्यावर बोलू नये : गोरे

व्यक्‍तिगत स्वार्थासाठी कुणाचा द्वेष करून मोठे होता येत नाही. आपण आपले अस्तित्व सध्या कुठे आहे याचा शोध घ्या. रोज कोलांट्या घेणार्‍यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या क्षमतेवर बोलू नये, असा टोलाही आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.

No comments

Powered by Blogger.