अन्यथा, आत्मदहन करु; सातारा शहर घंटागाडी संघटनेचा इशारा
सातारा: सातारा शहरात कचरा उचलणार्‍या घंटागांड्यासाठी खाजगी ठेकेदार नेमण्यात आला आहे. या ठेकेदाराकडून जुन्या घंटागाडीधारकांना त्रास होत असल्याचे कारण देत सातारा शहर घंटागाडी संघटनेने नुकतेच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे आपले निवेदन सुपूर्त केले आहे. त्याचबरोबर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी घंटागाडी संघटनेने दिला आहे.

घंटागाडी संघटनेने दिलेल्या निवेदनानूसार, गत 13 ते 16 वर्षापासून आम्ही शहरात कचरा वाहतुक घरोघरी जाऊन करत आहोत. आमच्या भवितव्यासंदर्भात नगरपालिकेने कोणतीही ठोस पाऊले उचललेली नाहीत. चौदाव्या वित्त आयोगानूसार आलेला ठेका ठाणे येथील साझा या कंपनीस देण्यात आला आहे. या कंपनीने आम्हास कोणतीही समाधानकारक वागणूक दिलेली नाही. एव्हाना आमच्या गाड्याही लेखी करारावर व भाडेतत्वावर घेतलेल्या नाहीत.

गत अनेक वर्षापासून आम्ही कमी मोबदल्यात करत असलेल्या कामामुळे सातारा नगरपालिकेस पुरस्कारही मिळालेले आहेत.

सध्या आमच्यावर ठेकेदार नेमून जाचक अटी करुन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही सातारा शहराचे भूमिपुत्र आहोत. आम्हाला स्थानिकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. ठेकेदाराने आम्हाला भाडेतत्वाचा लेखी करी करार करुन रुजू करुन घ्यावे. अन्यथा, न्याय न मिळाल्यास आम्ही आत्मदहन करु, असा इशारा घंटागाडी संघटनेने दिला आहे.

No comments

Powered by Blogger.