काँग्रेस संपणार नाही : सुशीलकुमार शिंदे


कराड : आणीबाणीनंतर इंदिरा गांधीसह काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेस संपली, अशी वल्गना करण्यात आली होती. मात्र, विरोधी सरकार तीनच वर्षांत कोसळून 1980 च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. आता पुन्हा 2014 पासून भाजप काँग्रेसला संपवण्याची भाषा करत आहे. मात्र, यापूर्वी तीनदा पराभव होऊनही पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्याचे सांगत काँग्रेस संपणार नाही, असा ठाम विश्‍वास माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्‍त केला.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 1942 च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव, रयत संघटना व राजकीय, सामाजिक वाटचालीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमास माजी खा. जयवंतराव आवळे, श्रमिक मुक्‍ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विनोद शिरसाठ, माजी आ. पी. एन. पाटील, प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी 1977 च्या पीडीएफ सरकारमध्ये होतो. त्यामुळे आमचीच काँग्रेस खरी आहे, असे आम्ही म्हणत होतो. मात्र, 1980 साली काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी झाली. कालांतराने आम्ही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आलो, असे सांगत तीनदा पराभव होऊनही काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. आता थापा मारल्या जात असून हे मतलबी सरकार कोसळणार असल्याचा विश्‍वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

सुशिलकुमार शिंदे विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना ते मंत्री होते. मात्र ते मला कधीही घाबरत नव्हते. आपले मत ते स्पष्टपणे मांडत होते. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे वडिलांप्रमाणेच ते निधड्या छातीचे आहेत. ते नेहमीच तत्वाच्या लढाईला साथ देतात. तसेच आमच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले होते. मात्र आम्ही कधीही गाजावाजा केला नाही. आज रोज सैनिक मरत आहेत. मात्र एखाद्या वाणीला मारून सरकार प्रसिद्धी मिळवून राजकारण करतात. मेमनचा मृतदेह मुंबईला पाठवतात आणि त्यावेळी 70 ते 80 लोक उपस्थित असतात, यातून द्वेष निर्माण होईल की नाही? असा प्रश्‍नही सुशिलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.

यावेळी कुमार केतकर, विलासराव पाटील - उंडाळकर, माजी आ. उल्हास पवार, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, विनोद शिरसाठ, बुधाजीराव मुळीक, ज्ञानेश महाराव यांचीही भाषणे झाली. प्रारंभी विलासराव पाटील उंडाळकर यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करून नागरी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

उंडाळकरच आमदार, कराड दक्षिणचे सतपाल...

विलासराव पाटील-उंडाळकर हे सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला आहे. मात्र, आता कराड दक्षिणमध्ये तेच सतपाल वस्ताद आहेत. तेच आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यांना मतदारसंघात जोडच नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना आता काँग्रेसमध्ये घ्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही त्यांच्या हाताला धरूनच त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन जा, असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांना माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी यावेळी केले.

No comments

Powered by Blogger.