गुंगीचे औषध देऊन चोरीचा प्रयत्न


म्हसवड : पंढरपूर-महाबळेश्‍वर एस.टी.मध्ये महिलेस पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन दीड तोळे लंपास करण्याचा प्रयत्न शेजारी बसलेल्या चोरट्या महिलेने केला. परंतु, तक्रारदार महिलेने म्हसवडमधील युवकांच्या सहाय्याने चोरट्या महिलेचा पाठलाग करून ऐवज हस्तगत केला व संशयित महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले.

संगीता शंकर काळे या पंढरपूर येथे दहिवडीकडे जाण्यासाठी पंढरपूर-महाबळेश्‍वर एस.टी.त बसल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या शेजारी सुनीता अर्जुन मोरे (वय 26) ही महिला येऊन बसली. प्रवासात संशयित महिलेने संगीता काळे यांचा गोड बोलून विश्‍वास संपादन केला. संगीता काळे दहिवडीत जाणार असल्याचे समजल्यानंतर आपणही दहिवडीची असून गावात मला सर्वजण ओळखत असल्याची बतावणी केली.

प्रवासादरम्यान सुनीता मोरे हिने संगीता काळे यांना पेढे व लाह्या विठ्ठलाचा प्रसाद म्हणून दिला. पेढे खाल्ल्याने संगीता यांना गुंगी येऊ लागली. म्हसवडला येईपर्यंत त्यांचे सव्वा तोळे सोन्याचे मिनी गंठन व मंगळसूत्र संशयित महिलेने काढून घेतले व म्हसवड बसस्थानकाच्या अलीकडेच रामोशी नाक्यावर उतरून पोबारा केला. काही वेळाने संगीता काळे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

याचवेळी एका शिक्षकाने महिलेस दुचाकीवरून रामोशी नाका परिसरात नेले. तेथे संशयित महिला घाईगडबडीने जात होती. तिला गाठल्यानंतर त्या दोघींमध्ये वाद सुरू झाल्यानंतर गर्दी होऊ लागली.अनेक महिला तेथे आल्या. चोरट्या महिलेने संगीता यांच्या बोटाचा चावा घेतला. त्यानंतर जमावातील महिलांनी संशयितेस चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले व मुद्देमाल संगीता काळे यांच्या ताब्यात दिला.

No comments

Powered by Blogger.