आधुनिकीकरणामुळे पैरा पद्धत कालबाह्य


सातारा : तरूण वर्ग शेतकामामध्ये दुर्लक्ष करत असल्याने हे काम कॉट्रॅक्ट पध्दतीने मजूर गटाला दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानावर मजूर गट काम करत असल्याने ग्रामीण भागात शेती व्यवसायाचा आधार असलेली पैरा पध्दती आता कालबाह्य होत चालली आहे. त्यामुळे तरूण वर्गातील अंगमेहनत व संघभावना कमी होवू लागली आहे.

शेती हा ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय असून शेतातील कामांसाठी अधिक मनुष्यबळाची गरज असते. यासाठी पैरा पध्दतीचा अवलंब केला जाई. एकमेकांच्या सहकार्याने शेतकाम करण्याची पध्दत म्हणजे पैरा पध्दत होय. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी ‘हम दो, हमारे दो’ अशा चौकोनी कुटुंबात मनुष्यबळ कमी पडू लागल्याने व शेतीकामासाठी मजुरांवर अवलंबून रहावे लागे. तसेच मजुरांना देण्यात येणार्‍या मोबदल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढू लागला. त्या तुलनेत उत्पन्न कमी मिळू लागले. यावर उपाय म्हणून मजुरांचा खर्च टाळण्यासाठी जवळच्या व भावकीतल्या लोकांच्या मदतीने पैरा करुन शेती केली जावू लागली. एकमेकाशेजारी शेती असलेले शेतकरी एकत्र जमून एकमेकांच्या शेतीतील, पेरणी, भांगलणी, काढणी, कापणी, मळणी अशी कामे करतात. यामध्ये शेतमजुरांची गरज भासत नाही. शेतातील कामांसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध होत असे.

हल्ली आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाल्याने यंत्राच्या सहाय्याने पेरणीपासून काढणी, मळणीपर्यंतची सर्व कामे होतात. त्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता कमी झाली आहे. यंत्रांचा वापर केल्यामुळे एक एकरातील भात, गहू, कापणी, काढणीसाठी पैरा पध्दतीमध्ये लागणारे मनुष्यबळ व वेळही वाचत आहे. त्यामुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढत असल्याने पैरा पध्दत कालबाह्य होत आहे. शेती व्यवायाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. याचबरोबर शेतकर्‍यांची सांघिक भावना, सामाजिक एकीकरण पध्दतीला सुरुंग लागण्याची भीती जानकारांमधून व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.