मीटर घोटाळ्याने महावितरणमध्ये खळबळ


सातारा : महावितरण कंपनीने दिलेले मीटर भांडारगृहातून गायब झाल्याचा प्रकार समोर आल्याने अधिकारी तसेच कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रत्येक शाखेत मीटर घोटाळ्याचीच चर्चा बुधवारी दिवसभर होती. महावितरण पुणे कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घोटाळाच्या पार्श्‍वभूमीवर अधीक्षक अभियंता संजय साळे (एसई) यांनी जिल्ह्यातील नोडल एजन्सीजची गुरुवारी तातडीने बैठक बोलावली आहे.

जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार सुरु आहे. त्यातच अधीक्षक अभियंता संजय साळे यांच्याकडे सांगली जिल्ह्याचाही चार्ज असल्याने सातार्‍यातील कामकाज विस्कळीत होवू लागले आहे. साळे कधीतरीच कार्यालयात उपलब्ध असतात. त्यामुळे तक्रार घेवून येणार्‍या शेतकर्‍यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या विविध समस्यांनी जिल्ह्याला पुरते ग्रासले आहे. मात्र हे प्रश्‍न सोडवण्याऐवजी काही अधिकारी तसेच कर्मचार्‍यांच्या वेगळ्याचा भानगड्या समोर येऊ लागल्या आहेत.

सातारारोड (ता. कोरेगाव) येथील भांडारगृहातून (वेअर हाऊस) मीटर गायब झाल्याचे समोर आले आहे. याठिकाणी येणार्‍या मीटरची नोंद महावितरणच्या सॅप सिस्टीममध्ये केली जाते. विभागीय कार्यालयांना मीटरचे लॉटप्रमाणे खाली वितरण केले जाते. त्यानुसार या मीटरची नोंद पुन्हा सॅप सिस्टीमध्ये होते. ग्राहकांनी वीज कनेक्शनसाठी केलेल्या अर्जानुसार संबंधिताला मीटर दिला जातो. या मीटरचा क्रमांकही अर्जावर नमुद केला जातो.

कार्यालयाने दिलेला मीटर ग्राहकापर्यंत पोहोचल्याने संबंधित मीटरची संख्या सॅप सिस्टीमधून कमी होते. महावितरणचे दिलेले मीटर आणि ग्राहकांना मिळालेले मीटर यातून मीटर संख्येची वजावट होत असते. मात्र, सातारारोड वेअर हाऊसमध्ये तसे झालेच नसल्याचे उघडकीस आले आहे. सिस्टीमध्ये मीटर शिल्‍लक असल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात मीटर उपलब्ध नाहीत. त्यामुळे या मीटरवर कुणी डल्‍ला मारला का? याची चर्चा सुरु झाली आहे.

प्रत्येक मीटरला स्वतंत्र युनिक क्रमांक दिला जातो. त्याची तशी नोंदही असते. त्यामुळे संबंधितांची फार मोठी गोची झाली आहे. बाहेरुनही मीटर आणून ते शिल्‍लक दाखवता येणार नसल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दै. ‘पुढारी’ने बुधवारच्या अंकात ‘महावितरणचा मीटर वितरणात महाघोटाळा’ या मथळ्याखाली प्रसिध्द केलेल्या वृत्‍ताचीच दिवसभर चर्चा होती. या वृत्‍ताची दखल पुणे कार्यालयानेही घेतली असून याप्रकरणी चौकशीची शक्यता सूत्रांनी व्यक्‍त केली आहे.

No comments

Powered by Blogger.