कृषी कर्मचार्‍यांचा कामावर बहिष्कार; कामकाज ठप्प


सातारा : जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कर्मचार्‍यांनी खोट्या तक्रारींमुळे होणार्‍या मानसिक त्रासामुळे कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे कृषी खात्याशी संबंधित अहवाल तसेच योजनांची कामे ठप्प झाली आहेत. शासनाने मागण्यांबाबत दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, विलास शंकर यादव यांच्याकडून खोट्या तक्रारी होत असून तपासण्यांमुळे कर्मचार्‍यांचा मानसिक छळ होत आहे. याप्रकरणी कृषी आयुक्‍त कार्यालयातील दक्षता पथकाचे कृषी उपसंचालक शिवराज ताटे यांची गृहखात्याकडून चौकशी करावी. तोपर्यत त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवावे. मागण्या मान्य न झाल्यास दि. 18 डिसेंबरपासून बेमुदत रजा आंदोलन सुरु करण्याचा इशाराही दिला आहे.

कृषी सहायक संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी अधिकारी संघटना वर्ग 2 क व कृषी अधिकारी संघटना वर्ग 2, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 1 या संघटनांनी हे आंदोलन पुकारल्याने जिल्ह्यातील सुमारे 600 अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या विभागप्रमुखांकडे रजेचे अर्ज सादर केले आहेत. क्षेत्रीय कर्मचारी संपावर गेल्याने या विभागाचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

शासनाला सादर करण्यात येणारे सर्व अहवालांचे कामकाज थांबले आहे. पेरणी अहवालही शासनाला सादर झालेला नाही. दि. 18 डिसेंबरनंतर शेतकर्‍यांना मार्गदर्शनही केले जाणार नसल्याने गैरसोय होणार आहे.

No comments

Powered by Blogger.