जिल्ह्यात गंभिर अपघात


कोरेगाव/शेंद्रे : वळसे (ता. सातारा) व चांदवडी (ता. कोरेगाव) येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीनजण ठार झाले. ए कूण चौघे जखमी झाले आहेत. वळसे येथील अपघातामध्ये माय-लेकाचा मृत्यू झाला असून, अतुल अशोक जाधव (वय 30) व मंदाकिनी अशोक जाधव (55, दोघे रा.रेठरे खु. ता.कराड) अशी त्यांची नावे आहेत.

वळसे अपघातात अशोक विष्णू जाधव (57), पूनम अतुल जाधव (25, रा. रेठरे खु., ता. कराड), शुभम रामराव जाधव (रा. अंबप, ता. हातकणंगले) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. झायलो कार (क्र. एम एच 14 पीएक्स 865) पुण्याहून कराडकडे निघाली होती. शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता वळसे (ता.सातारा) गावच्या हद्दीत आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी कारदुभाजकावर आदळली व तो दुभाजक तोडून कार पलीकडील लेनवर जाऊन आयशर टेम्पोवर (क्र. एमएच 11 एएल 6403) आदळली. कार टेम्पोवर आदळल्याने तो टेम्पोही 10 फूट सर्व्हिस रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या भीषण अपघाताच्या आवाजामुळे परिसरतील ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला.

अपघाताच्या घटनास्थळी काही ग्रामस्थांनी धाव घेतली असता जखमींनी मदतीसाठी टाहो फोडला होता. परिसरात रक्‍ताचा व काचांचा खच पडला होता. वाहतुकही ठप्प झाली. अपघातामधील जखमींना तत्काळ कारमधून काढून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. यातील मायलेकांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली वाहतुक सुरळीत करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

कोरेगाव-खेड रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चांदवडी (पुनर्वसीत) गावात झालेल्या दुसर्‍या एका अपघातात सौ. विद्या शिवाजी शिर्के वय 30 यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवाजी हणमंत शिर्के वय 35 हे गंभीर जखमी?झाले असून त्यांना अधिक उपचारार्थ पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी शिर्के व विद्या शिर्के हे पती-पत्नी आपल्या मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. 11-ए. व्ही.-5065) कोरेगावातील काम उरकून तडवळे संमत कोरेगाव या आपल्या गावी निघाले होते. चांदवडी गावात जोतिबा मंदिरासमोर समोरुन छोटा हत्ती टेंपो (क्र. एम. एच. 11- बी. एल.-6125 ) येत होता. मंदिरासमोर दोन्हींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सौ. विद्या यांचा मृत्यू झाला तर शिवाजी शिर्के हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पुणे येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. याप्रकरणी उत्तम भिकू शिर्के यांनी तक्रार दाखल केली आहेे. कोरेगाव पोलीस ठाण्यात टेंपो चालक विश्‍वासराव कांबळे रा. केदारेश्‍वरनगर, कळकाई कोरेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सतीश साबळे तपास करत आहेत.

No comments

Powered by Blogger.