पोलिसांना लाठिमार भोवला!कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणुक निकालादरम्यान वडगाव हवेलीतील काही जणांवर झालेल्या लाठीमार केल्याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अधिक्षकांच्या या निर्णयामुळे वडगाव हवेलीच्या आंदोलनकर्त्यांचे धरणे आंदोलन आज 24 व्या दिवशी मागे घेण्यात आले.

नितीन येळवे, देवानंद खाडे व प्रफुल्ल खाडे अशी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीवेळी वडगाव हवेलीत दोन्ही गट समोरासमोर आले होते. निवडणूक जिंकलेल्या गटाने जोरात जल्लोष केला. त्यावरून गावातील दोन गटात वाद झाला. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर केला. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी सौम्य लाठीमारही केला होता. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्यातील काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असून संबंधित युवकांना गुन्ह्यात अडकविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी केलेली मारहाणही अमानुष असल्याचा आरोप करत वडगाव हवेली येथील काही जणांनी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. या कालावधीत विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्याकडे तपास देत पारदर्शक तपास करण्यात येईल, असे आश्वासनही आंदोलनकर्त्यांना दिले होते. त्यानुसार आज पोलिस अधिक्षक श्री. पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी पुर्ण होईपर्यंत सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याचे सांगीतले. पोलिस अधिक्षकांच्या निर्णयामुळे वडगाव हवेलीच्या आंदोलनकर्त्यांनी आज 24 व्या दिवशी आंदोलन मागे घेतले.

No comments

Powered by Blogger.