एका महिन्यात जिल्ह्यात १४ लाख क्विं. साखर तयार


सातारा : सातारा जिल्ह्यात उसाचा गळीत हंगाम सध्या जोरात सुरू असून सातारा जिल्ह्याबाहेरील कारखान्यांच्या टोळ्या ठिकठिकाणी आल्या आहेत. मात्र, गेल्यावर्षी दिलेल्या उसाचे पैसे व्यवस्थित न दिल्याने संबंधित कारखान्यांना ऊस न घालण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. तर काही कारखान्यांनी नोंदीनुसारच तोडणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यात आजअखेर 13 लाख 62 हजार 870 मे.टन उसाचे गाळप होवून 13 लाख 82 हजार 375 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.14 पडला आहे.

सातारा जिल्ह्यात 8 सहकारी व 6 खाजगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यापासूनच पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. तसेच उसाचे क्षेत्रही जादा आहे. गतवर्षी ज्या कारखान्यांना शेतकर्‍यांनी ऊस घातला त्या शेतकर्‍यांना संबंधित साखर कारखान्यांनी यंदाही आपला ऊस घालावा यासाठी मोफत साखर वाटप केले आहे.

मात्र, गेल्या वर्षीच्या उसाला व्यवस्थित दर दिला नसल्याने काही शेतकर्‍यांनी त्या कारखान्यांना ऊस न घालण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी नोंदीनुसारच तोडणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र, काही शेतकर्‍यांनी जे कारखाने ऊस मागतील त्यांना तो घालताना दिसत आहेत. उसाचे क्षेत्र मोकळे करून अन्य पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे.

श्रीराम जवाहर फलटण कारखान्याने 84 हजार 586 टन उसाचे गाळप करून 87 हजार 650 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 1 लाख 44 हजार 960 टन उसाचे गाळप करून 1 लाख 52 हजार 810 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. किसनवीर सहकारी साखर कारखान्याने 88 हजार 750 टन उसाचे गाळप करून 86 हजार 440 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने 33 हजार 975 टन उसाचे गाळप करून 30 हजार 725 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सह्याद्री साखर कारखान्याने 2 लाख 15 हजार 500 टन उसाचे गाळप करून 2 लाख 47 हजार 260 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 1 लाख 4 हजार 690टन उसाचे गाळप करून 1 लाख 4 हजार 550 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. रयत सहकारी साखर कारखान्याने 69 हजार 640 टन उसाचे गाळप करून 67 हजार 830 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याने 36 हजार 950 टन उसाचे गाळप करून 31हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. न्यू फलटण कारखान्याने 72 हजार 439 टन उसाचे गाळप करून 69 हजार 645 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जयवंत शुगरने 1 लाख 25 हजार 240 टन उसाचे गाळप करून 1 लाख 36 हजार 650 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ग्रीन पॉवर शुगर लिमीटेडने 1 लाख 130 टन उसाचे गाळप करून 1 लाख 2 हजार 650 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.स्वराज्य इंडिया अ‍ॅग्रो लिमिटेडने 1 लाख 7 हजार 750 टन उसाचे गाळप करून 98 हजार 15 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. शरयु शुगर लिमिटेडने 1 लाख 78 हजार 260 टन उसाचे गाळप करून 1 लाख 67 हजार 150 क्विटंल साखरेचे उत्पादन केले. सातारा जिल्ह्यात सरासरी साखरेचा उतारा 10.14 पडला आहे.

No comments

Powered by Blogger.