पोलीस अधीक्षक पाटील म्हसवड पोलीस स्टेशनकडे लक्ष देणार का ?म्हसवड (महेश कांबळे): ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत असे चित्र दिसताच तेथील ठाणे अंमलदारास त्याबाबत जबाबदार धरुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा सपाटा जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी लावला असुन याचे सर्व सामान्य जनतेकडुन कौतुक होताना दिसत आहे. मात्र अशाच धंद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हसवड शहराकडे व येथील पोलीस स्टेशनकडे पाटील साहेब लक्ष देतील काय? असा प्रश्न येथिल सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

माण तालुक्यात सर्वात मोठे कार्यक्षेत्र म्हणुन म्हसवड पोलीस स्टेशनला ओळखले जाते. या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास ६९ छोटी मोठी गावे असुन ५ बीट आहेत तर १ स. पो. नि. दर्जाचा अधिकारी व त्यांना दोन सहाय्यक उपनिरीक्षक व कर्मचारीवर्ग असे देण्यात आले आहेत. म्हसवड पोलीस स्टेशन हे संवेदनशील म्हणुन ओळखले जाते. या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध गावात असलेले राजकीय गट त्यातुन होणारी भांडणे यामुळे सदर पोलीस स्टेशन नेहमीच तक्रार देणाऱ्यांची गर्दी दिसुन येते. याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास सर्वच गावात अवैध व्यावसाय सुरु असल्याने या ठिकाणी अधिकारी म्हणुन येण्यासाठी अनेकजण तयार असतात तर याउलट इतर प्रशासकिय कार्यालयातील अधिकऱ्यांना शिक्षा म्हणुन म्हसवडला पाठवले जात असल्याचे संबधीत अधिकारी सांगत असतात.
सध्या म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यावसायिकांनी पुन्हा आपली मोट बांधली असल्याचे दिसुन येत आहे. याकडे पोलीस स्टेशनने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याची चर्चा म्हसवडकर जनतेत सुरु आहे. वास्तवीक जिल्हा पोलीस अधिक्षक पाटील यांनी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरु राहतील त्यासाठी तेथील पोलीस अधिकारी व संबधित बीट प्रमुखास जबाबदार धरण्यात येणार असल्याचे जाहीर करीत जिल्ह्यात काही ठिकाणी अचानक भेट देवुन अवैध्य व्यावसायिकांच्या मुसक्या आवळुन यासाठी संबधीत पोलीस स्टेशनच्या बीट अंमलदारास जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचा सपाटा लावल्याने पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षकांनी उघडलेल्या या मोहिमेचे सर्वसामान्य जनतेतुन कौतुक होत आहे. पोलिस अधिक्षक पाटील यांनी यापुढे म्हसवड पोलीस स्टेशनला भेट देवुन सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांचा आढावा घ्यावा एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.