ट्रॅक्स चोरली; कागदपत्रे उधळली


सातारा : सातार्‍यात सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांची टेंम्पो ट्रॅक्स चोरुन घेऊन जाणार्‍या संशयिताने उमेदवारांची कागदपत्रेच रस्त्यावर भिरकावून दिली. या घटनेत दोघांची कागदपत्रे सापडलेली नाहीत. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तो सराईत चोरटा असल्याचे समोर आले असून त्याने 4 लाख रुपये किंमतीची 3 वाहने चोरली असल्याची कबुली दिली. दरम्यान कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे संबंधित मुलांना रडू कोसळले.

दत्तात्रय मोहन खुळे (वय 30, रा.अहिरे कॉलनी, देगाव फाटा, सातारा. मूळ रा.चिंचोली ता. सांगोला, सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथे सैन्य भरती सुरु असल्याने वाई तालुक्यातील काही युवक दि. 15 रोजी टेंम्पो ट्रॅक्स (एम एच 45 ए 7257) घेवून आले होते. वाहन भरती परिसरात लावल्यानंतर संशयित दत्तात्रय खुळे याने ते चोरी करुन नेले.
दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस सदरबझार येथे गस्त घालत होते. त्यांना रेकॉर्डवरील खुळे हा ट्रॅक्स चालवत असल्याचे दिसले. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी बाजूला घेतले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर ते वाहन चोरी केले असल्याची कबुली दिली.

चोरटा अट्टल असल्याचे समोर आले असून त्याने आणखी दोन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. दुचाकी चोरीप्रकरणी उंब्रज व कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, मोहन घोरपडे, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, निलेश काटकर यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

No comments

Powered by Blogger.