सातारा जिल्ह्यात १३८ शाळाबाह्य मुले


सातारा : स्थलांतरीत व शाळाबाह्य मुलांची यादी तयार करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार कधीही शाळेत न गेलेली, जन्म दाखल्याअभावी शाळेत प्रवेश न मिळालेली, मध्येच शाळा सोडलेली, शिक्षण हमी कार्ड नसलेली सुमारे 138 मुले आढळून आली असून त्यांना झेडपीच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.

स्थलांतरण प्रामुख्याने साखर कारखाना परिसर, वीटभट्टी क्षेत्र व बांधकाम सुरू असणार्‍या ठिकाणी होते त्या ठिकाणी भेटी देणे, त्या ठिकाणी स्थलांतरीत होवून आलेल्या मुलांचा शोध घेणे व या मुलांची संपूर्ण पत्यासह जिल्हा व तालुकानिहाय यादी करणे, स्थलातंरणाच्या ठिकाणापासून नजीकच्या नियमित शाळेत या मुलांना दाखल करणे. ज्या जिल्ह्यातून शाळेतून ही मुले आली आहेत त्या ठिकाणच्या शाळेकडून शिक्षण हमी पत्रक घेणे अशी कामे आठवड्यात करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या होत्या.

त्यानुसार वीटभट्या व उसतोड व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात सातारा 7, खटाव 3, पाटण 4, कराड 68, कोरेगाव 12, फलटण 22, वाई 22 असे मिळून 138 शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली.

स्थलांतरीत मुलांचा शोध घेण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिले होते. स्थलांतरीत मुलांबाबत 1 ऑक्टोबर 2015 च्या निर्णयानुसार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. मोठ्या संख्येने मुलांचे स्थलातंरण थांबविण्यात यंत्रणेस यश मिळत आहे.

परंतु, अद्यापही काही जिल्ह्यातून मुले पालकांसोबत स्थलांतरीत होत आहेत. अशी मुलेनिहाय माहिती ज्या ठिकाणी मुले स्थलांतरीत झाली आहेत. अशा स्थलांतरीत मुलांचा शोध, त्यांचे स्थलातंरण रोखणे, रोखण्याचे प्रयत्न केल्यावरही स्थलांतरीत होणार्‍या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या होत्या.

No comments

Powered by Blogger.