आजपासून साताऱ्यात सैन्य भरती


सातारा : सातार्‍यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल तसेच पोलिस परेड ग्राऊंडवर शुक्रवार दि. 8 रोजीपासून भारतीय सैन्य दलासाठी विविध पदांकरता युवकांच्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांच्या मैदानी चाचणी प्रक्रियेस पहाटे 1 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गोवा व सांगलीतील काही तालुक्यांना संधी दिली जाणार आहे. दिवसभरात 6 हजार 81 युवकांसाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील युवकांमध्ये सैन्य दलाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. सैनिकांचा जिल्हा अशी खास ओळख सांगणार्‍या सातार्‍यात सैन्य दलाच्या भरतीचे आयोजन करण्यात आल्याने तरुण या भरती प्रक्रियासाठी सज्ज झाले आहेत. शुक्रवारपासून दि. 18 रोजीपर्यंत सलग दहा दिवस राबवण्यात येणार्‍या या भरती प्रक्रियेमध्ये सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेड्समन आदि पदांसाठी युवकांची भरती केली जाणार आहे.

पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदूर्ग व गोवा आणि त्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव या तालुक्यांतील युवकांना संधी दिली जाणार आहे. पहाटे 1 वाजता युवकांना मैदानी चाचणीसाठी मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर पहाटे 4.30 पर्यंत धावणे ही प्रक्रिया होईल. त्यानंतर युवकांच्या लांब उडी, जोर काढणे, गोळा फेक आदि मैदानी चाचण्या घेतल्या जातील. संबंधित जिल्ह्यांतून सुमारे 61 हजार 81 युवक या भरती प्रक्रियेत उतरणार आहेत. सैन्य दलाच्या कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद रिक्रूटिंग ऑफिसेसच्या नियंत्रणाखाली युवकांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

सैन्य भरतीचे असे आहे वेळापत्रक

दि. 9 रोजी सांगली जिल्ह्यातील जत, मिरज, तासगाव, आटपाडी दि. 10 रोजी पलूस, खानापूर, कवठेमहंकाळ , सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, मंगळवेढा, बार्शी, सोलापूर (उ.) तालुक्यातील युवकांची भरती होणार आहे. दि. 11 रोजी सोलापूरमधील माढा, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, सोलापूर (द.), अकल्‍लकोट ; दि. 12 रोजी सातारा जिल्ह्यातील सातारा, माण, जावली तालुक्यातील युवकांची भरती होणार आहे. दि. 13 रोजी वैद्यकीय चाचणी व त्यानंतर दि. 14 रोजी पुन्हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, खंडाळा; दि. 15 रोजी महाबळेश्‍वर,वाई, पाटण, कराड; दि. 16 रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले; दि. 17 रोजी शिरोळ, करवीर, बावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा; दि. 18 रोजी कागल, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यांतील युवकांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त

सातारा शहरात सैन्य भरतीचे प्रथमच आयोजन होत आहे. यामुळे सातारकर व खुद्द पोलिसांनाही त्याबाबतचे अप्रुप आहे. सैन्य भरतीसाठी शाहू स्टेडियम व पोलिस परेड ग्राऊंडचे रुपडे पालटले आहे. भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा अद्यावत करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही कसूर राहिली नसून भरतीसाठी उच्च पदस्थ अधिकारीही दाखल झाले आहे. सैन्य भरतीसाठी सातारा पोलिसांचा दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त राहणार आहे. यासाठी प्रामुख्याने शहर व शाहूपुरी पोलिसांसह पोलिस मुख्यालयातील पोलिसांचाही समावेश राहणार आहे. दररोज सातारा पोलिस दलातील अधिकारी दोन्ही मैदानावर जाऊन पाहणी करत आहेत. दरम्यान, भरतीसाठी युवकांचा मोठा सहभाग राहणार असल्याने त्याबाबत कुतुहल निर्माण झाले आहे.

No comments

Powered by Blogger.