कराडात एकावर कोयत्याने वार, तिघांवर गुन्हा दाखलकराड : पूर्वी झालेल्या भांडणाच्या करणावरून एकावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले. येथील आझाद चौकात रविवार दि. 17 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

किरण बजरंग जाधव (वय 23, रा. रविवार पेठ, भोई गल्ली, कराड) असे जखमीचे नाव आहे. तर सागर मधुकर काटवटे, बच्चा मधुकर काटवटे, संतोष काटवटे (सर्व रा. आझाद चौक, कराड) अशी गुन्हा नोंद असलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, किरण जाधव व सागर काटवटे याचा दोन महिन्यापूर्वी वाद होऊन सागर काटवटे यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होती. दरम्यान, रविवारी रात्री किरण जाधव हा आईची औषधे आणण्यासाठी औषधाच्या दुकानात निघाला असताना सागर काटवटे, बच्चा काटवटे, संतोष काटवटे यांनी काठीने किरणला मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात तो जखमी झाला. वारंवार होणार्‍या या वादाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

No comments

Powered by Blogger.