फलटणकर देणार शहीद सद्भावना निधी


फलटण : देशाच्या सीमेवर रात्रंदिवस संरक्षण करीत असताना शहीद झालेल्या शहीदांना अभिवादन व त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून सद्भावना निधी प्रदान करण्याचा भावपूर्ण कार्यक्रम येथील महाराजा मंगल कार्यालयात मंगळवार, दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते व सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे कुटुंबप्रमुख दिलीपसिंह भोसले उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हिरालाल गांधी यांनी दिली.

येथील ज्येष्ठ नागरिक संघ, सद्गुरु व महाराजा उद्योग समूह, श्रीराम एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ‘शूरा मी वंदिले’ असा कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम ज्येष्ठ दानशूर द.वा.रानडे यांनी सुरु केला होता. गेल्या वर्षी या कार्यक्रमासाठी म्हणून दिलीपसिंह भोसले यांनी कायमस्वरुपी रु.1 लाख देणगी दिली होती.

यंदाच्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील शहीद झालेल्या गणेश किसन ढवळे (आसरे, ता.वाई), रविंद्र बबन धनावडे (मोहाट, ता.जावली), दीपक जगन्नाथ घाडगे (फत्त्यापूर, ता.सातारा), निलेश तुकाराम चव्हाण (तरडगाव, ता.फलटण) यांना आदरांजली व त्यांच्या कुटुंबियांना ‘सद्भावना निधी’ अर्पण केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष प्राचार्य रविंद्र येवले यांनी दिली.

या भावपूर्ण कार्यक्रमाचे ऐतिहासिक व भावनिक महत्त्व लक्षात घेवून या कार्यक्रमासाठी सामाजिक कर्तव्य म्हणून सर्व क्षेत्रातील नागरिकांनी, विशेषत: तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सुर्यवंशी - बेडके व श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तेजसिंह भोसले यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.