सावित्रींच्या लेकींचा प्रवास उभे राहूनच


परळी : सावित्रींच्या लेकींचा शाळेचा प्रवास सुखरूप व सुरक्षित व्हावा यासाठी एस.टी. बसमधील सहा आसने विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्यात आली असली तरी शासनाच्या या आदेशाला कोलदांडा दिला गेल्याचे चित्र आहे. संबंधित आदेश जिल्ह्यात कागदावरच राहिला असून विद्यार्थिनींना एस.टी. बसमधून उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रींच्या लेकींचा शालेय प्रवास असुरक्षित व धोकादायकच बनला आहे.

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी रोज शहराकडे प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान मुलींना चांगली सुविधा मिळावी यासाठी एस.टी.ची सहा आसने मुलींसाठी राखीव ठेवण्यात येणार होती. तसेच याची काटेकोर अंमलबजावणी शाळा, महाविद्यालये सुरू होताच करण्यात येणार होती. शासनाच्या या निर्णयामुळे एस.टी.मधून प्रवास करणार्‍या विद्यार्थिनींचा प्रवास सुखकर होण्याचे चित्र दिसून येणार होते. मात्र, याबाबतचे आदेश फक्त कागदावरच मर्यादित राहिले आहेत का? असा प्रश्‍न पडतो.ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी जाणार्‍या मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यांना शिक्षणासाठी प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू अथवा प्रवासात ताटकळत उभे राहू नये यासाठी बसमधील आसने राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार साध्या प्रकारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधील 6 आसने राखीव ठेवली आहेत. बसमधील आसन क्र. 7 ते 10 आणि 15 व 16 ही सहा आसने शाळकरी मुलींसाठीच ठेवण्यात आली आहेत. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने विदारक चित्र दिसत आहे. यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होणार? याकडे सर्व शालेय विद्यार्थिनींचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रवास बनलाय धोकादायक

चालक-वाहक व काही प्रवाशांच्या अडमुटेपणामुळे सावित्रीच्या लेकींना एस.टी. बसेसमध्ये दरवाजाजवळ राखीव जागा सोडाच, पण बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा विद्यार्थिंनींना एस.टी. ऐवजी नाईलाजाने वडापचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींचा प्रवास असुरक्षित व धोकादायक बनला आहे.

No comments

Powered by Blogger.