दहिवडी परिसरात चोरट्यांची दहशतदहिवडी : शहरात चोरट्यांनी दहशत निर्माण केली असून पोलिसांच्या पुढे चोरीच्या तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. चोर चोर्‍या करून पसार होत असल्याने अन् गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आठवडा बाजारातील पाकीटमारी, पर्स लांबवणे हे नित्याचे होत असतानाच अलीकडे दिवसा-ढवळ्या चोर्‍यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. म्हसवड येथील सरकारी वकील अ‍ॅड. मृणालिनी आव्हाड-सावंत या दहिवडी येथून सोलापूरला जात असताना त्यांच्या पर्समधील पाकीट अज्ञात चोरट्याने लांबवले. पाकिटात 27 हजारांची रोकड, एटीएम कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे होती. यानंतर चोरट्याने एटीएममधून पैसे काढण्यापर्यंत मजल गाठली. अ‍ॅड. मृणालिनी आव्हाड यांच्या बँकेच्या खात्यावर 58 हजार रुपये होते. यापैकी वडूज येथील काही बँकाच्या एटीएममधून चाळीस हजाराची रक्कम काढली. त्यानंतर एटीएम लॉक केल्यामुळे उर्वरित अठरा हजार वाचले.

दहिवडीच्या केदार पार्क या भरवस्तीत असलेले छाया संपत निकाळजे यांचे भरदिवसा फोडून चोरट्याने 50 हजाराची रोकड लंपास केली. दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातून कारखेलच्या लोखंडे या युवकाची दुचाकी चोरीला गेली आहे. चोरीचे गुन्हे दाखल आहेत मात्र, पोलिसांचा तपास धिम्यागतीने सुरु आहे. यामुळे चोरटे मोकाट असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. दहिवडी पोलिसांचा चोरांवरचा वचक कमी झाल्याने दिवसा ढवळ्या चोर्‍या करण्याचे धाडस चोर दाखवू लागले आहेत. पोलिसांनी कसून तपास करून या मोकाट चोरांच्या मुसक्या बांधाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

वरिष्ठ पातळीवरून दहिवडी पोलिसांवर तपासासंदर्भात लक्ष घातल्यास या वाढत्या चोर्‍याच्या तपासाला गती येवू शकते. बाजारात दिवसा ढवळ्या वारंवार चोर्‍या होत आहेत.याठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. तरीही पोलिस तेथे येत नाहीत. वडापच्या जवळ पोलीस घुटमळतात. त्याऐवजी बाजारातील चोर्‍या रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असा सूर जनतेतून उमटत आहे. वाहतूक पोलीस व वडाप वाले यांचे खरेच लागेबांधे आहेत का याचा तपास जिल्हा पोलिस प्रमुखांनी करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांतून होत आहे.

प्रवासात दागिने लंपास होण्याच्या प्रकारात वाढ

दहिवडी परिसरात अलिकडच्या काळात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. प्रवासादरम्यान चोर्‍या होऊ लागल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासाला गती देवून चोरट्यांचा बंदोबस्त केल्यास चोरट्यांवर पोलीसांचा वचक राहील. दरम्यान, गत सप्हातात दोन महिलांचे दागिने लंपास करण्याचा प्रयत्न झाला होता. या दोन्ही प्रसंगी महिलांनी प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवला होता. त्यामुळे प्रवासादरम्यान, अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्‍वास ठेवणे अंगलट येऊ शकते.

No comments

Powered by Blogger.