पाणी प्रयोगशाळांची समस्या जटिल


सातारा :आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र तालुकास्तरावरील पाणी तपासणी प्रयोगशाळांची स्थिती अतिशय बिकट आहे. या प्रयोगशाळांना कुठे जागाच मिळत नाही तर कुठे जागा असली तरी लॅबमधील उपकरणे नादुरूस्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे ठोस अहवाल प्राप्त होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द पाणी कधी मिळणार? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सध्या जिल्हास्तरावर एकच पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहे. साथीचे अनेक आजार दुषित पाण्यापासून होतात ते रोखण्यासाठी शुध्द पाणीपुरवठ्याचा शासनाचा हेतू आहे. त्यासाठीच तालुकास्तरावर पाणी तपासणीच्या प्रयोगशाळा बांधण्याचा प्रकल्प शासनाने जाहीर केला. त्यानुसार जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेची नव्याने भूजल सर्व्हेक्षण विभागामार्फत उभारणी महामार्गावरील अजंठा चौकालगत सुरू आहे. मात्र, तालुका स्तरावर पाणी तपासणी प्रयोगशाळांची समस्या बिकट आहे.

खंडाळ्यात प्रयोगशाळेसाठी जागा उपलब्ध आहे पण अजुन कार्यवाही होताना दिसत नाही. येथे असलेल्या प्रयोगशाळेतील बरीचशी उपकरणे नादुरूस्त आहेत. तसेच केमीकलही नाही. कार्यालयीन कामकाजासाठी कागद उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाणी नमुने घेतलेले रिपोर्ट कसे द्यावयाचे असा प्रश्‍न येथील कर्मचार्‍यांना पडला आहे.
जावली तालुक्याची प्रयोगशाळा मेढ्यामध्ये आहे मात्र कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी ही प्रयोगशाळा सोमर्डी येथे आहे. तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना पाणी नमुने देण्यासाठी सोमर्डी येेथे जावे लागत आहे.

कराड येथील प्रयोगशाळेसाठी ग्रामीण रूग्णालयात जागा उपलब्ध होत आहे. मात्र पंचायत समिती स्तरावरून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. माण तालुक्यातील प्रयोगशाळा दहिवडी येथे उभारण्यात येणार आहे मात्र त्यासाठी जागाच उपलब्ध झाली नाही. तसेच तेथील कर्मचार्‍यांकडे तपासणीसाठी पाण्याचे नमुने नसल्याचे दिसून येत असून त्यांच्याकडे पाणी नमुने तपासणीसाठी साहित्यच उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी कशी करावयाची? असा प्रश्‍न तेथील कर्मचार्‍यांना पडला आहे.

गेल्या वर्षी पाणी नमुने घेण्यात महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचा दुसरा क्रमांक होता. मात्र यावर्षी प्रयोगशाळांची अशी अवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली का नाही, याबाबतचे ठोस अहवाल प्राप्त झाले नसल्याचे समोर आले आहे.पाणी तपासणी प्रयोगशाळा या पाणी व स्वच्छता विभागाच्या अखत्यारीत आल्या तर प्रयोगशाळेच्या कामात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागात पाण्याचे नमुनेच तपासले जात नाहीत बहुतांश ठिकाणी प्रयोगशाळा बांधण्यासाठी जागेची मागणी वारंवार होत असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तसेच ग्रामीण भागात होणार्‍या पाणीपुरवठयाचे नमुने तपासायला हवे होते मात्र त्यासाठी केमीकल व अन्य साहित्य जर प्रशासनाकडून वेळेत उपलब्ध होत नसेल तर तितक्या प्रमाणात पाण्याचे नमुने तपासले जात नाहीत ही शोकांतिका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

No comments

Powered by Blogger.