थंडीच्या लपंडावामुळे रब्बी पिके धोक्यातसातारा : लांबलेला पावसाळा व त्यानंतरही थंडीचा सुरू असलेला लपंडाव यामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होत असून जिल्ह्यातील गहू, हरभरा, मका या पिकांचे उत्पादन घटण्याची धास्ती शेतकर्‍यांना लागली आहे. तसेच ऊस पिकावरही काही ठिकाणी लोकरी मावा व तांबेरा रोग पडला आहे. काही दिवस थंडी तर पुन्हा ढगाळ वातावरण तर मध्येच पाऊस अशा वातावरणामुळे पिकांची हानी होत असल्याने शेतकरीवर्ग संभ्रमात असून किमान दोन महिने थंडी चांगली पडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे बहुतांश तालुक्यात गहू, हरभरा आदी पिकांसह अनेक रब्बीची पिकांची चांगली लागवड करण्यात आली आहे. रब्बीतील गहू, हरभरा, पिकांसाठी थंडी अत्यावश्यक असते. तथापि, पावसाळा लांबल्यामुळे या पिकांसाठी आवश्यक असलेली थंडी पडलेली नाही. अनेकदा थंडी सुरू झाली रे झाली की ढगाळ वातावरण निर्माण होवून थंडी गायब होत आहे. दरम्यान, ओखी वादळामुळे चक्क पावसाळी माहौलच सुरू झाला होता. या बदलत्या हवामानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होवू लागला आहे. गहू हे थंड व कोरड्या हवामानात वाढणारे पिक आहे. त्यामुळे सर्वात जास्त फटका गहू तसेच ऊस या पिकांना होण्याची शक्यता असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

दरम्यान, कांदा, टोमॅटो तसेच पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडेही शेतकर्‍यांचा कल वाढला होता. तथापि, कांद्याचे दर तेजीत जात असतानाच केंद्र शासनाच्या धोरणामुळे दरात चढ-उतार होत आहेत. कांद्यांचे दर वाढल्यानंतर रोपांचेही भाव वाढले होते. तथापि, पिक हातात येईपर्यंत दर तेजीत राहतील का याबाबत शेतकरी साशंक असून अस्मानी संकटाला तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे किमान उत्पादित मालास चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.