शस्त्र प्रदर्शनातून ताकदीची झलक


कराड : रणगाडा भेदणारे रॉकेट लाँचर... भारतीय बनावटीची लाईट मशीन गन अन् जिल्ह्यासह राज्यातील शहिद जवांनाच्या स्मृतींना उजाळा देणार्‍या शस्त्र प्रदर्शनाने शुक्रवारी पहिल्याच दिवशी कराडकरांची मने जिंकली. त्याचबरोबर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संपूर्ण जीवनचरित्रावरील छायाचित्रांचे दालन पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

भारतीय लष्कराच्या बांगलादेश मुक्‍ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कराडमध्ये गेल्या 20 वर्षांपासून विजय दिवस समारोह समितीकडून विजय दिवस साजरा केला जातो. या समारोहात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, निवृत्त कर्नल संभाजी पाटील, माजी नगरसेवक अरुण जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ झाला.

मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे जवान भारतीय बनावटीचे 5.56 लाईट मशिन गन, 40 एमएम मल्टी शॉट ग्रेनेड लाँचर, तसेच भारतीय लष्कराच्या ताफ्यातील शस्त्रांसह या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. रणगाडा भेदणारे रॉकेट लाँचर या प्रदर्शनाच्या आकर्षणाचा ठरत आहे.

आज दुपारी रंगणार मुख्य सोहळा...
विजय दिवस समारोहात 16 डिसेंबरला येथील शिवाजी स्टेडियमवर होणारा मुख्य सोहळा या समारोहाचे प्रमुख आकर्षण असतो. दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्‍नू, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

No comments

Powered by Blogger.