शेतकर्‍याला शेतीमालाचे स्वातंत्र्य कायम


ढेबेवाडी : अहोरात्र काबाडकष्ट करून शेतीमाल तयार करणार्‍या शेतकर्‍याला तो विकायचा कुठे याचे स्वातंत्र्य आहे. तो शेतमाल बाजार समितीकडेच आला पाहिजे हा अट्टाहास कशासाठी, असा सवाल करून शेतकरी सोडून सर्वांचे भले करून बाजार समित्यांचे संचालक पोसायचा ठेका शेतकर्‍यांनी घेतलेला नाही, असा घणाघाती हल्ला कृषी व पणन राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांनी केला.

बनपुरी ता.पाटण येथे स्व.दादासाहेब मोकाशी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी बांधलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन ना. खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पं.स.सभापती सौ.उज्ज्वला जाधव, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे संचालक विश्‍वजीत मोकाशी व अभिजित मोकाशी, पं.स.सदस्य प्रतापराव देसाई, प्रांताधिकारी तांबे,उद्योजक राजू मस्कर,इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष राजाराम धावडकर, आर.टी.स्वामी, तालुका कृषी अधिकारी तुषार जाधव, दत्ता सुर्वे, रघुनाथ जाधव आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

ना.खोत म्हणाले, आम्ही शेतकर्‍यांची स्वायत्तता जपण्यासाठी भाजीपाला व कडधान्ये आणि शेतीमाल नियमन मुक्त करण्याचा निर्णय घेतला. बाजारात कुठेही शेतमाल विक्रीची परवानगी दिली तर त्यावर गदारोळ केला जातो. बाजार समित्या बंद ठेऊन संपाची हाक दिली जाते मात्र शेतकर्‍यांचा विचार कुणी करीत नाही, बाजार समितीत माल नेल्यावर आडते,व्यापारी,हमाल, मापडी यांचे भले होते. शेतकर्‍याच्या लुटीचा कुणी विचार करीत नाही. उलट शेतीमालाचे दर वाढल्यावर अनेकांच्या पोटात दुखायला लागते. मात्र डिझेल,पेट्रोल, साबण, सोने, चांदी, मोटारींची दरवाढ झाली तर कुणी आवाज काढत नाही.

एफ.आर.पी.प्रमाणे पहिली उचल 2750 रूपये व पुढच्या प्रति एक रिकव्हरीला 268 रूपये प्रमाणे ऊस उत्पादकांना दर मिळालाच पाहिजे.कर्जमाफी देताना दिरंगाई झाली हे त्यांनी मान्य केले. प्रा.चौधरी व बनपुरीचे उपसरपंच शिवाजीराव पवार यांनी स्वागत केले. प्रा.एस.एम.शिंदे यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.