सशस्त्र मारामारीत गंभीर जखमी


कराड : लग्‍नाच्या आधल्या दिवशी गावदेव कार्यक्रम सुरू असताना लोखंडी गज, साखळी व फायटर याचा वापर करून झालेल्या मारामारीत पाच जण जखमी झाले. यापैकी एक जण गंभीर आहे. तर मारामारीप्रकरणी उपसरपंचासह 14 जणांवर कराड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ओंड (ता. कराड) येथे बुधवार रात्री ही घटना घडली.

शुभम थोरात, प्रवीण थोरात, उपसरपंच प्रकाश थोरात, जयवंत थोरात, योगेश शेट्टे, मनोज थोरात, गणेश थोरात, गणेश संभाजी थोरात, सागर थोरात, अरविंद माळी, संकेत थोरात, प्रवीण माळी, सुनील थोरात, आशिष थोरात (सर्व रा. ओंड, ता. कराड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर संशयितांनी केलेल्या मारहाणीत नितीन प्रल्हाद थोरात हा गंभीर जखमी असून, अक्षय थोरात, अमर थोरात, प्रवीण थोरात, विनित थोरात, अमोल थोरात हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अक्षय थोरात याच्या चुलत भावाचे लग्‍न असल्याने गावदेव भेटीचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास पाचपट्टी मळ्यातून सर्व जण पायी चालत ओंड गावात निघाले होते. त्याच वेळी मांगवडा येथील भोसले मॅडम यांच्या घरासमोर शुभम थोरात हा मोटारसायकलवरून आला. तो गावदेव कार्यक्रमावेळी मोटारसायकलवरून मागे-पुढे करू लागला. त्यामुळे अक्षय थोरात व विनित थोरात यांनी तू आमच्या कार्यक्रमात विनाकारण मोटारसायकलवरून चकरा का मारतोस, असे शुभम थोरात याला विचारले.

त्यावेळी तू कोण मला विचारणार, तुझ्या बापाची वाट आहे का, असे शुभम म्हटल्याचा राग आल्याने अक्षय थोरात याने त्यास चापट मारली. त्यानंतर तुला दाखवतो असे म्हणून शुभम तेथून निघून गेला. काही वेळाने गावदेवाचा कार्यक्रम करत ते सर्व जण पायी चालत गावातील मारुती मंदिर चौकात आले. तेथे रात्री 9.15 च्या सुमारास संशयितांनी शिवीगाळ करत तुम्हाला जास्त मस्ती आली आहे, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.

No comments

Powered by Blogger.