अंगणवाड्यांचे शिक्षण भाड्याच्या खोलीत


सातारा : सातारा जिल्ह्यात शासकीय कार्यालयाचे इमले चढत असले तरी बालकांसाठी महत्वाच्या असलेल्या जिल्ह्यातील 2 हजार 67 अंगणवाड्यांना हक्काची इमारत नाही. ग्रामपंचायत कार्यालयात 199 तर समाजमंदिरात 253 अंगणवाड्या भरत आहेत.

सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात 4 हजार 810 अंगणवाड्या कार्यरत आहेत. यातील 2 हजार 743 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. प्राथमिक शाळेत 643, ग्रामपंचायतीमध्ये 199, समाजमंदिरात 253, देवळात 82, खाजगी इमारतीमध्ये 163, भाड्याच्या इमारतीमध्ये 727 अंगणवाड्या भरतात. अंगणवाड्यांना इमारतीच नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. या निराधार अंगणवाड्या प्राथमिक शाळा, समाजमंदिर, देवालयात भरत असून काही अंगणवाड्या भाड्याच्या घरात सुरू आहेत. चिमुकल्यांच्या अंगणवाड्यांना शासन हक्काचा निवारा कधी देणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये लाखो बालके लाभ घेत आहेत. या अंगणवाड्यांमधून लहान मुलांच्या आरोग्यविषयक तपासण्या, त्यांना आरोग्यविषयक डोस, जंताच्या गोळ्या, सकस आहार दिला जातो.एवढेच नव्हे तर गरोदर स्त्रिया, बाळंत, स्तनदा स्त्रिया यांचीही काळजी या अंगणवाड्यांमधून घेतली जाते. यावरून अंगणवाड्यांचे महत्व लक्षात येते. अनेक अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने जी जागा उपलब्ध होईल तेथे अंगणवाड्या भरवल्या जात आहेत. अशा जागेत स्वच्छतेचा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. काही ठिकाणच्या अंगणवाड्या या पावसाळ्यात गळत असल्याचे वास्तव आहे.

गावोगावी अंगणवाड्यांना इमारती आवश्यक आहेत. यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला तरी निधी मिळणे मुश्किल झाले आहे. अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळत होता. मात्र, हा निधी आता बंद झाला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

बालकांना उघड्यावरच घ्यावे लागते शिक्षण

लहान मुलांचे आरोग्य, शिक्षण, विकास यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात असले तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण व दुर्गम भागात या योजनांची पुर्तता अजूनही झाली नसल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे बालकांच्या आरोग्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून खर्च केला जातो. मात्र दुसरीकडे या बालकांना दररोज उघड्यावरच शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. या मुलांना ऊन, थंडी, पाऊस अशा वातावरणाचा सामना करावा लागत आहे.

No comments

Powered by Blogger.