ड्रेनेजचे सांडपाणी थेट नदीपात्रात


कराड : कराडच्या दुर्गंधीयुक्‍त, कडवट चवीच्या पाण्यास टेंभू योजनेबरोबरच पाण्यात मिसळला जाणारा मैला कारणीभूत ठरत आहे. शहरात अनेक ठिकाणी पाण्यात थेट मैला मिसळत असल्याने पाणी आरोग्यास घातक ठरत आहे. मलकापूर सह नदीपात्रात खासगी ड्रेनेजचा मैला मिसळत असून नदीपात्रातील पाणी पिवळसर झाले आहे. पालिकेकडून पाणी शुध्दीकरण केले जात असले तरी इतर गावांकडे शुध्दीकरण यंत्रणा नसल्याने तो मैला थेट नदीच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे पाण्याला जडत्व (हार्डनेस) निर्माण होत आहे.

कृष्णा नदीत अनेक गावांसह कराडमधील सांडपाणी, मैला तसेच कारखाने, उद्योग, हॉस्पिटल यामधून निघणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. टेंभू प्रकल्पामुळे नदीचे पात्र अडवले आहे तेथून मागे नदीचे पात्रात घातक ऑरगॅनीक व इनऑरगॅनिक केमिकल्स मिसळू शकतात. पाणी अडवल्यामुळे या केमिकल्सचे प्रमाण सदरचे पात्रात वाहून नदीचे प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका पोहचू शकतो.

कारखान्यांनी विना प्रक्रिया नदी पात्रात सोडलेली केमिकल्स तसेच शेतीस वापरलेली रासायनिक खते, किटकनाशके, हॉस्पिटलचे सांडपाणी यामुळे नदीच्या रासायनिक प्रदुषणात वाढ होत आहे. यशवंत हायस्कूलच्या पाठिमागे पालिकेच्या पंपिंग स्टेशनचे पाणी नदीपात्रात गटारीद्वारा मिसळले जाते. या नदीपात्रात अनेक खासगी ड्रेनेजेचेही पाणी मिसळले जाते.याठिकाणी अवस्था अत्यंत भयानक आहे. याठिकाणचे पाणी पिणे अत्यंत घातक असल्याचे याठिकाणी परिस्थिती पाहिल्यास लक्षात येते. पाणी काळे, चवीला कडवट व खराब आल्याने नागरिकांमधून भिती व्यक्‍त करण्यात आली आहे. याठिकाणी बारमाही कडवट पाणी

मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नदीचे पाण्यात मिसळणार्‍या काही घातक केमिकल्समुळे कॅन्सर सारखे घातक आजार होऊ शकतात. तसेच लिव्हर, मज्जासंस्था यावर सुध्दा या केमिकल्सचा परिणाम होवून मानवी जीवन धोक्यात येवू शकते. मानवी शरीरावर या केमिकल्सचा हळुहळू अपाय होत असतो त्यामुळे या रासायनिक प्रदुषणाचे परिणाम मानवी जीवनावर तात्काळ दिसून येत नाहीत.

पाण्यात वाढणार्‍या काही प्रकारचे शेवाळांमुळे सुध्दा काही प्रकारचे घातक केमिकल्स पाण्यात मिसळत असतात त्याचा सुध्दा मानवी जीवनावर घातक परिणाम होत असल्याने याबाबत पालिकेने गांभीर्याने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पालिकेकडून पाणी शुध्दीकरण करण्यात येत असले तरी मलकापूर, सैदापूर आदी गावांकडे पाणी शुध्दीकरण करण्याची यंत्रणा नसल्याने हा मैला थेट नदीत मिसळला जात आहे तो आरोग्यास घातक ठरणार आहे.

No comments

Powered by Blogger.