राजू शेट्टी, सदाभऊ खोत हाजीर हो ऽऽ


फलटण : फलटण तालुक्यात 2013 मध्ये झालेल्या ऊस दर आंदोलनप्रकरणी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना फलटण न्यायालयाने दि. 16 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शेतकर्‍यांसाठी संघर्ष करणार्‍या या दोन्ही नेत्यांत फूट पडल्यानंतर कोर्ट तारखेच्या निमित्ताने ते एकत्र येण्याचा योग आला आहे. यामुळे दोघेही उपस्थित राहणार का? याचीच उत्सुकता लागली आहे.

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी याबाबत 2013 साली ऊस दराबाबत चिथावणीखोर वक्तव्य केली होती. त्यानंतर चौधरवाडी, जिंतीरोड ता. फलटण हद्दीतील उसाच्या गाड्या अडवून हवा सोडणे, पंक्चर करणे अशा घटना घडल्या होत्या. यामुळे स्थानिक पदाधिकार्‍यांसह राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, शंकर शिंदे, नितीन यादव, सचिन खानविलकर, रवींद्र घाडगे, अमोल तावडकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. यासाठी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी फलटण यांनी समन्स बजावून 3 नोव्हेंबरची तारीख दिली होती व राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी कोणत्याही सबबीशिवाय हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, न्यायाधिशांना ट्रेनिंगला जावे लागल्यानंतर 16 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सदाभाऊ खोत यांनी सरकारमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजू शेट्टी यांनी खोत यांची हकालपट्टी केली. यानंतर खोत यांनी नवीन संघटनेची स्थापना केली. सध्या दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. एकमेकांविरोधात बोलण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. तारखेच्या निमित्ताने फलटणमध्ये आल्यावर ते काय वक्तव्य करणार ? याची फलटण तालुक्यात उत्सुकता आहे. शेट्टी उपस्थित राहणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे परंतु, खोत हिवाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहणार का? असा प्रश्‍न रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाला आहे. दोन्ही न्यायाधीश यांच्याकडे दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची सुनावणी आहे.

No comments

Powered by Blogger.