गुप्तचर संघटनेत जाण्यासाठी बनावट कागदपत्रे; एकावर गुन्हा


म्हसवड : गुप्तचर संघटनेत भरती होण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून खोटी कागदपत्रे तयार करून सागर आबाजी शिंदे, रा. पानवण (पांगळेवाडी)ता. माण याच्याविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेत संशयीताने एन.आय.ए. या संघटनेच्या नावे कोल्हापूर आयजी कार्यालयाला खोटी कागदपत्रे पाठवल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रकाश इंदलकर यांनी संशयीत सागर शिंदे  याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सागर शिंदे हा नोकरीच्या शोधार्थ आहे. त्याने त्याच्या मोबाईलद्वारे ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गर्व्हर्मेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली’ ही वेबसाईट सर्च केली.  या वेबसाईटवर त्याने भरतीचा फॉर्म पाहिला व दिल्ली येथील अधिकार्‍यांची नावे व संपर्क क्रमांक घेतले.
दिल्ली येथील एनआयए या अधिकार्‍याने सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍याला पत्र दिले तर आपल्याला चांगली नोकरी भेटेल व कॅनडा येथे जाण्याची संधीही मिळेल, असा संशयीताचा समज होता. त्यानुसार म्हसवड येथील एका नेटकॅफेमधून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या नावे एक बनावट पत्र तयार केले. ते पत्र एन.एन.डी. दुबे, नवी दिल्ली या अधिकार्‍याने दिले आहे, असे संशयिताने भासवले व तयार केलेले बनावट पत्र कोल्हापूर आयजी कार्यालयाला पाठवले. 
कोल्हापूर आयजी कार्यालयाला पत्र मिळाल्यानंतर त्याबाबत चौकशीला सुरुवात झाली. चौकशीदरम्यान फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर त्याच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा तसेच आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

No comments

Powered by Blogger.