वाईत दबंगगिरीचे चित्रीकरण


मेणवली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेल्या वाई तालुक्याला स्थानिक भाईगिरीच्या गुंडागर्दीचे ग्रहण लागल्यामुळे गेली दोन वर्षापासून वाई परिसरातील चित्रपटांचे चित्रीकरण बंद करत दिग्गज चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी या परिसरात कायमचीच पाठ फिरवल्यामुळे लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान यामुळे स्थानिक रोजगारी, छोटे व्यावसायिक उघड्यावर आले आहेत.

चित्रपटांचे चित्रीकरण बंद झाल्याने तालुक्यातील अनेक व्यवसायिकांसह बेरोजगारांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे. वाई तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पहाता पन्नासच्या दशकापासून भारतभूषण, राज सिप्पी, सुभाष घई, प्रकाश झा यासारख्या अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक दिग्गजांनी सुपरहिट हिंदी -मराठी सिनेमांचे वाईच्या पवित्र भूमीत चित्रीकरण करून वाईला जगाच्या नकाशावर आणले.

वाई तालुक्यात होणार्‍या विविध चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान अनेकांना चांगलाच धनलाभ मिळू लागला. यातूनच मिळणार्‍या मलिद्यावरून अंतर्गत शीतयुद्ध सुरू होवून त्याचे भडके उडाले. यामुळे चित्रीकरणावर परिणाम होवून चित्रीकरन बंद पडून निर्मात्यांचे दिवसाकाठी लाखो रूपयांचे नुकसान होऊ लागले. आता तर या प्रकारांना वैतागून सर्वच निर्माते व दिग्दर्शकांनी वाईकडे कायमची पाठ फिरवली आहे.

निसर्गसौंदर्य लाभल्यामुळे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक दक्षिण काशीबरोबरच पश्‍चिम भागातील धोम जलाशयालगतचा परिसर मुगाव, धोम,मेणवली व अन्य गावात चित्रीकरणास पहिली पसंती देत होते. यातूनच या गावांना लाखो रूपयांचा महसूल मिळत होता. मात्र, हप्तेगिरीच्या ग्रहणामुळे तोही बंद हाऊन गावाचे व पर्यायाने ग्रामस्थांचे नुकसान झाले. यामुळे अनेकांचे रोजगार संपले. हॉटेल व्यवसायिक, वाहनवाले, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, इस्रीवाले, धुलाईवाले अनेक छोटयामोठया कष्टकर्‍यांचा हक्काचा धंदाही बुडाला गेला आहे. भाई लोकांच्या दंबगगिरीमुळे निसर्गसौंदर्याची खाण असलेल्या या परिसराला आता अवकळा आली आहे.

बहुतांशी चित्रपट बिग बजेटचे असल्याने दिवसाला लाखो रुपयांची होणारी उलाढाल आता बंद झाली असून परिसरातील कष्टकर्‍यांची रोजीरोटीही गेली आहे. कष्ट न करता कमिशनद्वारे भरपूर पैसे मिळवण्यासाठी या परिसरातील काही गुंडांनी एकमेकांवर घाणेरडे कुरघोडीचे राजकारण सुरू करुन वाद उफाळून आल्याने बर्‍याच वेळा सुरु असलेले चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडण्याचे प्रकार वाढू लागल्यानेच याकडे निर्मात्यांनी पाठ फिरवली आहे.

या गाजलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण

गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजेपासून हिरो, याराना, सरगम, दबंग, जत्रा, सर्जा यासारख्या सिल्व्हर जुबिली चित्रपटांसह अ‍ॅास्करपर्यंत मजल मारलेल्या स्वदेश चित्रपटासारखे सिनेमे दक्षिण काशीच्या पवित्र भूमीत चित्रीत केले गेले.

मेणवलीच्या वाड्यातील वर्दळ थांबली

पेशव्यांच्या दरबारातील प्रमुख व्यक्‍तिमत्त्व असलेले नाना फडणवीस यांनी मेणवली येथे बांधलेला वाडा ऐतिहासिक दस्तावेज बनला आहे. या परिसरात तसेच वाड्यातही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पार पडले. आता कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण होत नसल्याने वाड्यातील वर्दळ थांबली आहे.

No comments

Powered by Blogger.