Your Own Digital Platform

उद्यापासून सैन्य भरती


सातारा : सातारा येथे शुक्रवार दि. 8 पासून होणार्‍या सैन्य भरतीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी बॅरेकेट्स, कॅम्प उभारण्यात आले आहेत. सैन्य भरतीसाठी युवकांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता गृहीत धरुन पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सैन्य भरती कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत दि. 8 ते 18 डिसेंबरपर्यंत सातारा येथे सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सातार्‍यात ही भरती छत्रपती शाहू जिल्हा स्पोर्टस ग्राऊंड व पोलिस परेड ग्राऊंड येथे संपन्न होणार आहे. या भरतीमध्ये सोल्जर जीडी, सोल्जर टेंडमेन, सोल्जर क्लार्क, स्टोअर किपर टेक्नीकल, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर ट्रेडमेन, सोल्जर टेक्नीकल एव्हिएशन या पदांची भरती होणार आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे गरजेचे होते.

दहा दिवस भरती प्रक्रिया चालणार असल्याने दोन्ही मैदाने सज्ज झाली आहेत. दोन्ही मैदानावर भरतीसाठी आवश्यक असणार्‍या छावणीसाठी जागा तयार करण्यात येत आहेत. अवघ्या काही तासाने भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातीलही युवकांचा या भरतीसाठी सहभाग राहणार आहे.