अपघात’ नव्हे तर घातपातालाच आमंत्रण


पाटण : कराड-चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून बहूतेक जागी रस्त्याच्या मध्यभागीच विहिरीएवढे मोठे खड्डे काढले आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात येथून वाहतूक करणार्‍या प्रवाशी अथवा वाहनांची सुरक्षा रामभरोसे असून हे भलेमोठे खड्डे येथे ’ मौत का कुआँ ’ बनल्याने अपघात नव्हे तर घातपाताचे आमंत्रण ठरत आहे. याबाबत सामान्यांचा आवाज दाबण्याचा आरोप होत असतानाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयही कोणाच्या दबावाखाली गप्प आहे ? याबाबत सर्वच पातळ्यांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कराड-चिपळूण या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी ही कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी मोठ्या कंपन्यांना या कामाचा ठेका देण्यात आला आहे. मात्र ज्या पटीत कामाची व्याप्ती व खर्च पाहता येथे सध्या रस्त्यावरून वाहतूक करणारी वाहने अथवा त्यातील प्रवाशी यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची अवश्यक खबरदारी घेतली गेली नसल्याचे नमुने ठराविक अंतरावर अनुभवायला मिळतात. मुळ रस्त्यावर खड्यांचा आकार पाहता उर्वरित रस्ता की पायवाट हाच गंभीर प्रश्‍न आहे तर यातून जीवघेणी चालकांची कसरत यातच छोटे मोठे अपघात घडू शकतात.

तर महाकाय खड्डे काढल्यानंतर त्याच्या आजूबाजूला म्हणावीशी सुरक्षा यंत्रणा,पत्रे , रेडीयम, सुरक्षारक्षक ठेवण्यात आले नाहीत. दिवसा जेथे वृक्षतोड चालू असते. अशा ठिकाणी तकलादू व्यवस्था असते मात्र रात्रीच्या वेळी तर ही सुरक्षा अक्षरशः रामभरोसेच असते. त्यामुळे अगदी जवळ आल्याशिवाय हे खड्डेच दिसत नाहीत त्यामुळे वाहनांचा वेग लक्षात घेता येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो हे निश्‍चित. त्यामुळे जर याठिकाणी मोठा अपघात झाला तर संबंधित कंपन्यांच्या अशा बेजबाबदारपणा व त्यांना अप्रत्यक्षरीत्या संमती देणार्या बांधकाम, पोलीस, आर. टि.ओ.आदी विभागाच्या वरिष्ठांवरच थेट मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशाही प्रवाशांच्या मागण्या आहेत.

एका बाजूला हे महाकाय खड्डे तर दुसरीकडे रस्त्याकडेची तोडलेली झाडे त्यांची अस्ताव्यस्त पडलेली लाकडे, फांद्या तर काही अर्धवट तोडलेली झाडे हीदेखील प्रवाशांच्या अपघातांसाठी आमंत्रणच ठरत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावरच भल्यामोठ्या सिमेंटच्या पाइप कशाही टाकण्यात आल्याने भरीत भर म्हणून त्याही धोकादायक बनल्या आहेत. एका बाजूला यांनी रस्त्याची तर पूरती वाट लावलीच आहे त्याचवेळी दुसर्‍या बाजूला याच रस्त्याकडेच्या शासकीय फलकही राजरोसपणे जमीनदोस्त करून टाकले आहेत.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याचाही जाब संबंधितांना विचारला नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता पुढे नक्की कोठे जातो, गावांच्या नावाचे अथवा अंतर सांगणारे, वळण आणि धोक्यासाठी सावधानतेचा इशारा देणारे फलक या रस्त्यावरतरी चुकून यांच्याकडून वाचले तरच पहायला मिळतील. तोपर्यंत मात्र वाहतूकदारांना सुरक्षेची काळजी व अवश्यक ती माहिती आपली आपल्यालाच ठेवावी लागणार हे निश्‍चित.

इतरवेळी रस्त्यांवरील वाहतूक, अपघात व प्रवाशांच्या खबरदारीसाठी कार्यरत असणारा पोलिस व आर. टि.ओ. विभाग मात्र याबाबत का पुढे येत नाही? त्यांच्या हातात नक्की कोणत्या व कोणी ,कसल्या बेड्या घातल्यात ? असाच साधा व सोपा प्रश्‍न वाहतूकदारांनाच न्हवे तर सामान्यांनादेखील पडला आहे.

याबाबत जाब नक्की कोणाला विचारायचा. .?

या रस्त्यावर अचानक वेगवेगळ्या कामांना सुरूवात झाली. त्यामुळे प्रवाशी, वाहने, व रस्त्यांचीही पुरती वाट लागली आहे. इथला प्रवास म्हणजे एक अपघाताचे आमंत्रणच ठरत आहे. कामाचा दर्जा असो अथवा प्रवाशांची सुरक्षा याबाबत कोणालाही जाब विचारता येत नाही. कारण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कोठेच शासकीय अथवा कंपन्यांचे अधिकारी, जबाबदार व्यक्ती नसतात. केवळ कर्मचार्‍यांवरच इथला कारभार सुरू आहे.

No comments

Powered by Blogger.