पहिली उचल राष्ट्रीयकृत की जिल्हा बँकेत?


सातारा : सध्या जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची ऊसतोड जोमाने सुरु आहे. शेतकर्‍यांचे पहिल्या हप्त्याचे बील कधी आणि कोणत्या बँकेत जमा होणार? ते किती दिवसात मिळणार? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाले असून याबाबत तातडीने संबंधित विभागाने खुलासा करण्याची मागणी होत आहे.

आता ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. त्या अनुषंगाने असे प्रश्‍न शेतकरी बांधवांतून सध्या चर्चले जात आहेत. जनावरांसह पहाटे 5 वाजल्यापासून ऊसतोड मजुरांचा शिवारात गलबलाट सुरु आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी कारखाना परिसरात बैलगाड्या तर लांब अंतरावरील ऊस नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रकांची भिरकीट सुरु झाली आहे. अजिंक्यतारा, कृष्णा, सह्याद्री, मरळी, जयवंत शुगर, न्यू फलटण, श्रीराम फलटण, जरंडेश्‍वर आदी कारखान्यांसाठी जोमाने ऊसतोड सुरु आहे.

यावर्षीही ऊसक्षेत्र घटले असल्याने जो तो कारखाना ऊस नेण्याची घाई करत आहे. ऊसतोड जोमाने सुरु असल्याने साखर कारखान्यांच्या आवारात ऊस घेवून आलेल्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. सर्वच ऊसतोडकरी भल्या पहाटे ऊसतोडीला प्रारंभ करुन दुपारपर्यंत सुमारे 15 ते 20 टन ऊस तोडत असल्याचे चित्र शिवारात दिसून येत असून संध्याकाळीही ऊन खाली झाल्यानंतर तोडणीसाठी सपाटा लावत आहेत. ऊसतोडी नेटाने सुरु असल्याने ऊसाचे वाढे विकून तोडकर्‍यांनाही पैसे मिळू लागल्याने त्यांचे अर्थचक्र सुरळीत सुरु आहे.

दरम्यान गेली काही वर्षे ऊस उत्पादकांना बर्‍यापैकी दिवस आले असून त्यांचा ऊस वेळेत जात आहे. त्याशिवाय ऊसाला दरही चांगला मिळत आहे.

No comments

Powered by Blogger.