फलटणला राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’


फलटण : फलटण तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीच्या वतीने दि. 6 रोजी भाजप सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. दीपक चव्हाण आणि जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहर तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली.

तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी भाजप सरकार फक्त आश्‍वासनाची खैरात करत आहे. परंतु, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या नावाखाली झुलवुन ठेवत असून सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला असल्याची टिका केली. शासनाने इतक्या नियम व अटी एवढ्या लावल्यात की कोणालाही कर्जमाफीचा फायदा होत नसून फडणवीस सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याच्या आरोप संजीवराजे यांनी केला.

यावेळी आ. दीपक चव्हाण म्हणाले, शेतकर्‍यांना नवीन कृषीपंपाचे वीज कनेक्शन देणेही गेल्या 3 वर्षात सरकारला जमले नाही. तसेच भरमसात वीजबिलामुळे जनता अडचणीत आली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना फसव्या कर्जमाफीच्या जाहिराती सुरु असल्याच्या आरोप त्यांनी केला. ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनीही सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले. सर्व शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, गुजरातच्या धरतीवर कापसाला हमीभावावर 500 रुपये प्रतिक्विंटल बोनस, कापूस, तूर, सोयाबीनची खरेदी केंद्रे तातडीने सुरु करावीत, फसव्या आणि खोट्या जाहिराती बंद करून जनतेच्या पैशाची बचत करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोर्चात नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, सभापती सौ. रेश्मा भोसले, तालुकाध्यक्ष विलासराव नलावडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, ‘श्रीराम’चे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, भीमदेव बुरुंगले, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.