आलवडी-धावली गाव परिसरात गव्यांचा धुडगूस


परळी : परळी गावच्या डोंगरावर असलेल्या आलवडी, पाटेघर, नावली, धावली तसेच जावलीच्या सरहद्दीवर कोयना पुनर्वसित जुंगटी गावामध्ये रानगव्यांनी धुडगुस घातला आहे. शेतकर्‍यांनी पेरलेल्या गहू पिकाची रोज रात्री रानगव्यांकडून नासधूस केली जात आहे. हुरड्यावर आलेल्या पिकाचे होत्याचे नव्हते होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जुंगटी गावाच्या चोहोबाजूला वनविभागाची जमीन आहे. या भागात जंगल परिसर अधिक असून वन्यप्राणी वास्तव्य करतात. वर्षानुवर्षे रानगव्यांचे कळप या भागात वाढू लागले आहेत. रानगव्यांसह वन्य प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून दगडी बांध घातले आहेत.
यावर्षी पेरलेल्या गहू पिकातून तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यासाठी खुली करावी लागली. मात्र, तेथे खुली केलेली जागा रानगवे व इतर वन्यप्राण्यांसाठी खुले प्रवेशद्वाराच झाले असल्याने रानगवे कधी कधी दिवसाही शेतात घुसण्याचा प्रयत्न करतात. हे गाव कोयना पुनर्वसित असून 50 वर्षांपूर्वी मूळ खातेदाराला उदरनिर्वाहासाठी 4 एकर जमीन मिळाली होती. त्याला पोटहिस्से असून आज तिसरी व चौथी पिढी सुरु आहे. त्यांच्या वाट्याला 10 ते 15 गुंठे जमीन आली आहे. त्यातच या जमिनींमध्ये पाण्याअभावी गहू हे एकच पिक घेतले जाते.  एवढेच पिक शेतकर्‍यांना आधार ठरत आहे. मात्र, या पिकावरही आता संकट आले असून रानगव्यांनी अनेकांची शेतीच फस्त केली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 

No comments

Powered by Blogger.