सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात तेव्हा शत्रूला धोका वाटतो : शामसुंदर महाराज सोन्नरसातारा: महंमद पैगंबर जयंतीनिमित्त सर्वधर्म भाईचारा सभेचे आयोजन करून सातारकरांनी चांगला पायंडा पडला आहे . सर्व समाजातील जातीधर्माचे लोक एकत्र येतात तेव्हा ती वेळ शत्रूला धोक्याची घंटा वाटते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रवचनकार ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर ( मुंबई ) यांनी केले. 

येथील गांधी मैदान येथे महंमद पैगंबर जयंतीनिमित्त सर्वधर्म भाईचारा सभेचे आयोजन सातारा येथील गांधी मैदानावर परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती व मुस्लीम जागृती अभियान , सातारा यांचे वतीने आयोजित केलेल्या सर्व धर्म भाईचारा सभेत सोन्नर बोलत होते. अध्याक्ष्स्थनी कष्टकरयांचे ज्येष्ठ नेते अॅड. बाळासाहेब बागवान ( लोणंद ) होते. 

यावेळी महाराष्ट्र बसव परिषदेचे अॅड. शिवानंद हैबतपुरे ( उमरगा ) , हजरत मौलाना कमरुद्दीन तांबोळी ( सातारा ) , प्रा. हुमायून मुरसल ( कोल्हापूर ) , बिशप थॉमस डाबरे ( पुणे ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

 ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, समाजाला एकत्र आणण्याचे काम वारकरी सांप्रदाय करीत आहे. वारकरी हा कुठल्याही एका जातीचा, धर्माचा असू शकत नाही. तर, मानवता धर्माचा वारकरी असतो. भारतात विविध जातीधर्माचे लोक राहतात. यासाठी भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. यासाठी महापुरुषांची शिकवण आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. 

धर्म जेव्हा व्यवसाय होतो तेव्हा माणुसकीचा विस्फोट होतो. अशावेळी जातीवादाला थारा देऊ नये.’ असे आवाहन महाराष्ट्र बसवपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी केले.

आपणा सर्वांना एकाच देवाने निर्माण केले आहे. आपण सर्वजण भाऊबहिणी आहोत. सर्व धर्म समभाव हा संदेश संतानी दिला आहे. तरीदेखील भारताचे सध्याचे वातावरण चिंताजनक आहे. दुर्दैवाने मुस्लीम समाजाविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. यासाठी आपण सर्वांनी सर्व धर्म समभावाचा भाईचारा वाढवला पाहिजे.’ असे आवाहन पुणे येथील बिशप थॉमस डाबरे यांनी केले.
हजरत मौलाना कमरुद्दीन तांबोळी म्हणाले, पैगंबरांनी शांती आणि अमनसाठी जी शिकवण दिली आहे त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. समाजातील बिघाडही मनातील बिघाडीमुळे होते. त्या मनाला सुधारण्यासाठी पैगंबरांचे जीवनशैलीचे अनुकरण करून त्यांचे विचार आपण स्वतःत उतरवून जगाला दाखवा की, इस्लाम म्हणजे भाईचारा आहे.’
प्रा. हुमायून मुरसल यांनी कुराणामधील दाखले देत. मुस्लीम समाजविषयक जाणीवपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या अफवा खोडून काढत. सर्व प्रकारच्या मुलतत्ववादाला विरोध केला. अध्यक्षस्थानी असणाऱ्या बाळासाहेब बागवान यांनी संयोजकांचे अभिनंदन करत यासारखे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. 

 यावेळी जेष्ठ विचारवंत डॉ दत्तप्रसाद दाभोलकर , अहमद कागदी , मिनाज सय्यद, जयंत उथळे, मिलिंद पवार, मुजफ्फर शेख , अरिफ शेख , विजय मांडके, यांचेसह सर्वधर्मीय स्त्री व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय मयूर खराडे यांनी केला . सूत्रसंचालन व आभार मोहसीन शेख यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.