लाचप्रकरणी महिलेवर गुन्हा


सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सातारा शाखेतील जिल्हा व्यवस्थापक तबस्सुम मुल्‍ला या महिला कर्मचार्‍याला 15 हजार 800 रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी अटक केली. दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास सातारा कार्यालयातील क्‍लार्कवरील कारवाईनंतर दुसर्‍याच दिवशी आणखी एक कारवाई करून ‘एसीबी’ने कारवाईचा डबल धमाका केला.

तबस्सुम शमशद्दीन मुल्‍ला (वय 45, रा. निशिगंधा कॉलनी, कोडोली) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या मुलीचे शैक्षणिक कर्ज प्रकरण मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून मंजूर करण्यात आले होते. त्याच्या तिसर्‍या हप्त्यासाठी पडताळणी करून सही, शिक्‍का हवा होता. या कामासाठी तबस्सुम मुल्‍ला हिला तक्रारदार भेटल्यानंतर त्यांनी 15,800 रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दि. 5 रोजी तक्रार दिली. लाचेची रक्‍कम गुरुवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचला व पैसे घेताना रंगेहाथ कारवाई केली. लाचेची रक्‍कम सातार्‍यातील रविवार पेठेतील कार्यालयातच स्वीकारताना ही कारवाई झाली. या कारवाईमध्ये पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्‍ला, पोलिस हवालदार संभाजी बनसोडे, आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, विजय काटवटे, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विनोद राजे, विशाल खरात यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.