ओखी वादळामुळे शेतकरी त्रस्तमायणी : ओखी चक्री वादळाचा फटका द्राक्ष बागांना बसत असून गेल्या दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार चिंतातुर झाले आहेत.

द्राक्ष बागांच्या छाटण्यानंतर वातावरणातील बदलाचा हा चौथा फटका आहे. डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांकडून वर्तवली जात आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष बागा वाचविण्यासाठी धडपड करू लागले आहेत.

वातावरणातील बदलाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसत असून बुरशीजन्य रोगाबरोबरच डाऊनीचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा होण्याच्या शक्यता आहे. गत पंधरा वीस दिवसांपूर्वी बदललेल्या हवामानामुळे द्राक्ष पिकावरील बुरशीजन्य रोग औषध फवारण्या करून कसाबसा रोखला मात्र, बदलत्या वातावरणात या रोगांनी पुन्हा डोके वर काढू नये म्हणून द्राक्ष उत्पादक मोठी धावपळ करत आहते. द्राक्ष बागातून औषधांच्या पंपांचे आवाज दिवस-रात्र घुमू लागले आहेत. इंटरनेटवर मिळत असलेल्या हवामानाचा बदल शेतकर्‍यांना अगोदरच माहीत होत असल्याने जागृत शेतकर्‍यांना त्याचा फायदा होत आहे.

यावर्षी द्राक्ष बागांच्या छाटण्या नंतर हवामानातील बदलाचा हा चौथा पाचवा हल्ला आहे ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील हवामान बदलाबरोबर पडलेल्या पावसामुळे 20 ते 25 टक्के बागांचे नुकसान झाले होते. कलेढोण, मायणी, निमसोड, विखळे परिसरातील द्राक्ष बागांचे त्यावेळी मोठे नुकसान झाले होते. यातच ओखी चक्री वादळाचा परिणाम नक्कीच जाणवणार आहे.

स्ट्रॉबेरी उत्पादकांचे कंबरडे मोडले

ओखी वादळामुळे महाबळेश्‍वर तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाने तसेच धुक्याने स्ट्रॉबेरी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. ओखीच्या फाटक्याने स्ट्रॉबेरी उत्पादकांचे ऐन हंगामातच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

ओखी चक्रीवादळाने जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला होता. त्याचा फटका महाबळेश्‍वर तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. गेली दोन तीन दिवस या परिसरतील ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याने परिसराला वेढले होते. पावसाने शेतात पाणी साठले होते तर स्ट्रॉबेरी काळवंडली असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. तालुक्यात सुमारे 3 हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे. प्रामुख्याने तालुक्यातील मेटगुताड, भिलार, गुरेघर, खिंगर, अवकाळी, भोसे तसेच तालुक्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी घेतली जाते.

पाऊस व धुक्यामुळे स्ट्रॉबेरीला धोका पोहोचला आहे तर कडाक्याच्या थंडीचा फायदा गहू, ज्वारी पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. स्ट्रॉबेरी हे तालुक्यातील मुख्यपीक आहे यावरच येथील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह चालतो. ऐन उत्पादनाच्या हंगामताच स्ट्रॉबेरी पीक ओखीच्या विळख्यात सापडली असून तोडनी योग्य फळांवर पावसाने काळे स्पॉट पडले आहेत. त्यामुळे हा नुकसान झालेला माल बाजारपेठेत न जाता तो प्रक्रियेला जात आहे. त्यामुळे भाव कित्येक पटीने कमी होणार आहे त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संक्रात ओढवली आहे. पावसाने स्ट्रॉबेरीची फुले कोमेजनार असून उत्पादनावर परिणाम जाणवणार आहे. फळे आणि रोपांवर माती उडाल्याने विक्री योग्य ताजी फळे कमी सापडणार आहेत.

No comments

Powered by Blogger.