शेतकरी योजनेला निकषाचा खुट्टाकराड : विशेष घटक योजना जानेवारी 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविली जात असली तरी 40 गुंठे क्षेत्राच्या जाचक अटीमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. वर्षभरात जवळपास पन्नास टक्केनी लाभार्थी घटल्याने भविष्यात ही योजना बंद पडण्याचीच शक्यता अधिक आहे.

योजनेतून अनुसुचित जाती, नवबौध्दांना कृषी योजनांचा लाभ दिला जातो. पूर्वी ही योजना विशेष घटक म्हणून राबवली जात होती. सुधारीत योजनेत या योजनेच्या लाभासाठी शेतकर्‍यांना 40 गुंठे क्षेत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनुसुचित जातीमध्ये अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या अधिक असल्याने अनेक शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.

कराड तालुक्याचा विचार केल्यास कृषी विभागात नोंद असणार्‍या अनुसुचित जातीमधील शेतकरी खातेदारांची संख्या 6 हजार 388 येवढी आहे. यामध्ये 40 गुंठे पेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 4 हजार 984 इतकी आहे. म्हणजे या एका निकषामुळे निम्म्याहून अधिक शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले. 50 गुंठे ते 1 हेक्टर क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 908 आहे. एक ते 2 हेक्टर 406, 2 ते 3 हेक्टर 58, 3 ते 4 हेक्टर 15, 4 ते 5 हेक्टर 3 आणि 5 ते 6 हेक्टर क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍याची संख्या आहे अवघी एक. 40 गुंठे अथवा त्याहून अधिक क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत असले तरी यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी डोंगराळ भागात आहेत त्यामुळे विहिरीचा लाभ घेता येत नाही.

काहींचे क्षेत्र नदीकाठी आहे पण त्यांना पाणी परवाना नाही. काहींजवळ जातीचा दाखल नाही तर काही शेतकरी परगावी मुक्कामी आहेत. निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांची ही अवस्था. त्यामुळे या योजनेचे प्रस्ताव घ्यायचे तरी कसे या विवंचनेत पंचायत समितीचा कृषी विभाग आहे. वर्षभरात केवळ 30 प्रस्ताव कसेबसे या योजनेसाठी आले आहेत. या योजनेच्या लाभार्थींची संख्या वाढण्याऐवजी सुधारीत योजनेतील जाचक अटीमुळे 50 टक्केहून अधिक घटली आहे. 40 गुंठे क्षेत्राची अट रद्द करावी अशी मागणी पंचायत समितीच्या सभेत केली होती मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही.

No comments

Powered by Blogger.