धरण उशाला अन् कोरड घशाला


कुडाळ : जावली तालुक्यातील लोकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी 21 वर्षापूर्वी धरण बांधून पूर्ण झाले आहे. त्यानंतरही मात्र कालव्यांची कामे न झाल्यामुळे जावलीकरांची ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

धरणात ज्या वर्षी पाणीसाठा होणार असतो, त्याच्या चार महिने आधी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याकरता कालवे तयार असावे लागतात. मात्र, याला हे धरण अपवाद ठरत आहे. 2004 मध्ये महू,हातगेघर धरणाच्या जलाशयात पाणीसाठा झाला. मात्र, कालवे तयार नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी मिळाले नाही. धरणातील पाणी शेतीसाठी मिळत नसल्याने पाण्याखाली येणारे क्षेत्र मोठया प्रमाणात शेतकर्‍यांनी विकले. त्यामुळे आज धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले तरी संपूर्ण शेती ओलिताखाली येत नाही.

दुसरीकडे धरणाचे काम पाहणारे पाटबंधारे विभागाचे अधिकारी-अभियंत्यांवर कामे वेळेवर होत नसल्याने कारवाई होत नाही. धरणाचे पाणी 21 वर्षे पडून ठेवण्यास पाटबंधारे विभाग पूर्णपणे जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. असे असताना केवळ शेतकरी जमीन देत नाहीत म्हणून कालवे काढता येत नाहीत, अशी थातूर मातूर उत्तरे अधिकारी देत आहेत.

यावर सरकारी यंत्रणाही मूग गिळून बसली आहे. महू हातगेघर धरण म्हणजे अली बाबाची गुहाच आहे. जेव्हा जेव्हा निधी मंजूर झाला तेव्हा तेव्हा सत्तेच्या खुर्चीधारकांनी निधी चापला. स्थानिक मंत्री भुमीपुत्र यांनाही धरण पूर्ण करता आले नाही. सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे वाडगे जनतेपुढं ठेवून पळवाट काढण्यात आली. त्यानंतर सत्ताबदल झाल्यानंतर युतीच्या काळात ही साडेसाती संपेल, अशी शेतकर्‍यांची आशा होती. मात्र, आजतागायत या धरणाबाबत ना कोणता निर्णय ना कोणते काम अशी परिस्थिती आहे.

गेल्या 20 वर्षात जेमतेम अवघे 6 किलोमीटरचे कालवे पाटबंधारे विभागाने बनवले आहेत. त्यातही अनेक ठिकाणी अजूनही भूसंपादन सुरू करण्यात आलेले नाही. कालवे सुरू होतील या आशेने 10 वर्षापूर्वी सिमेंटच्या पाईप आणण्यात आल्या होत्या. त्यातील एकही पाईप कालव्यात लावलेली नाही. पाटबंधारे विभाग कासवगतीने काम करणार असेल तर पुढील 5 वर्षे काय पुढील अनेक वर्षे काम संपणार नाही, अशी परिस्थिती असून कालव्याची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

15 कि.मी. कालव्यांची गरज

कालवे नसल्याने मागच्या 20 वर्षात धरणाचे पाणी शेतीला मिळाले नाही व पुढील 5 वर्षे पाणी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे एक धरण पूर्ण होऊन एक अख्खी पिढी शेतीत खपली तरी पाण्याचा टिपूस शेतीला मिळेना. धरणाच्या पाण्यातून 1 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र, त्यासाठी 15 किलोमीटरचे कालवे बनवावे लागणार आहेत.

No comments

Powered by Blogger.