बैलगाडी शर्यत बंदी कायम राहिल्याने निराशा


सातारा : सध्या यात्रा, जत्रांचा हंगाम मोठ्या सातारा जिल्ह्यात सुरू झाला आहे. यात्रांमध्ये मुख्य आकर्षण असलेले बैलगाडी शर्यतींवर बंदी असल्याने यात्रा-जत्रांच्या उलाढालींवरही परिणाम जाणवू लागला असून यात्रेचा बाज हरवत चालला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती न देता हे प्रकरण विस्तारित खंडपिठाकडे सोपवले आहे. त्यामुळे हजारो बैलगाडी शर्यतप्रेमींची निराशा झालेली आहे.

म्हसवडच्या सिद्धनाथाच्या यात्रेनंतर जिल्ह्यातील यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मोठ्या यात्रा भरत असतात. त्यानंतर मे महिन्यापर्यंत गावोगावी, वाड्या वस्त्यांवर विविध देवतांच्या यात्रोत्सव साजरा केला जातो. पुसेगाव येथील यात्राही आता सुरू होत आहे. यात्रांच्या निमित्ताने मनोरंजनाची साधने, मेवा मिठाईची दुकाने येत असतात.

तथापि, यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बैलगाडी शर्यती मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. शर्यती होत नसल्याने यात्रांचा अस्सल ग्रामीण बाज हरवत चालला आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, म्हणून बैलगाडी चालक-मालक संघटनांनी प्रशासनाच्या प्रत्येक पातळीवर कायदेशीर लढा दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले होते.

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती न देता हे प्रकरण विस्तारित खंडपिठाकडे सोपवले आहे. यामुळे बैलगाडी शर्यत शौकिनांची घोर निराशा झाली आहे. सांस्कृतिक हक्‍कांसाठी सरकारला याबाबत कायदा करण्याचा अधिकार आहे की नाही याबद्दलचा निर्णय विस्तारित खंडपीठ घेणार असून याचा निर्णय आठ आठवड्यांनी देण्यात येणार आहे. तोपर्यंत शर्यतीचे बैल दावणीलाच बांधावे लागणार असून बैलगाडी मालक व चालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बैलगाड्यांच्या शर्यतीमुळे अनेक उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिक, रसवंतीगृहे, आईस्क्रिम पार्लर, पान टपर्‍यांच्या यात्रेतील उलाढालीवर तसेच दोरखंड व्यावसायिक, सुतारकाम, लोहार काम करणार्‍या व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. मुक्या प्राण्यांची होणारी छळवणूक थांबवण्यासाठी ही बंदी घातलेली आहे. मात्र, त्याऐवजी कडक अटी, निर्बंध घालून शर्यती मुक्‍त वातावरणात पुन्हा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

बैलांच्या संगोपनावर लाखो रुपये खर्च

शेतकर्‍यांनी खिल्लारी व शर्यतीच्या बैलांच्या संगोपनासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. आजही त्यासाठी शेतकरी नियमित मेहनत होत आहे. बैलांचा खुराक, निगा याबाबत अत्यंत जागरूक रहावे लागते. खिल्लारी व शर्यतच्या बैलांना जनावरांच्या बाजारातही मोठी मागणी असते. या जातीच्या बैलांच्या किंमती लाखांच्या घरात असतात. शर्यतीवर बंदी असल्याने जनावरांच्या बाजारातील उलाढालीवरही परिणाम होवू शकतो.

No comments

Powered by Blogger.