दहशतवादी संघटनेत भोंदूबाबा


सातारा : पुणे येथील महिलांवरील अत्याचारप्रकरणी मूळ सातारचा असणार्‍या भोंदूबाबा हैदरअली शेख याच्या अनेक सुरस कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. भोंदूगिरीसाठी तो आठवड्यातून दोन वेळा दरबारही भरवत होता. याशिवाय हैदरअलीवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सखोल तपास करावाच, असा पवित्राही त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, मुंबईतील दहशतवादी संघटनेशी संबंधित एका मोर्चात त्याचा सहभाग असल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी पोलिसांकडून त्याची चौकशी झाल्याचेही समोर आले आहे.

सातारच्या हैदरअलीविरुद्ध पुणे येथील दोन महिलांवर अत्याचार, त्यांची लुबाडणूक व भोंदूगिरी केल्याप्रकरणी जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला बुधवारी तपासासाठी सातार्‍यातही आणले होते. हैदरअलीच्या या कृत्यामुळे सातार्‍यातील गुरुवार पेठेत खळबळ उडाली. दुसर्‍या दिवशीही त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. हैदरअली सातार्‍यात राहत असला तरी सध्या तो पुणे येथे वास्तव्य करत होता.

सातार्‍यात जेव्हा तो असतो तेव्हा भोंदूगिरीच्या माध्यमातून लोकांना सल्‍ला देण्यासाठी आठवड्यातून दरबारही भरवत होता. दैवीशक्‍ती असल्याची खोटी बतावणी करून अनेकांची त्याने फसवणूक केली असल्याची चर्चा आहे. याच माध्यमातून दोन महिलांवर त्याने अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाल्याने सातारा हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार यांची व हैदरअलीच्या कुटुंबियांची ओळख आहे. आर्थिक देवाण घेवाणीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी खोटे आरोप झाले असल्याचे हैदरअलीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

हैदरअलीचा तपास सुरु असतानाच त्याचे पाच वर्षापूर्वीचे मुंबईतील एक कनेक्शन समोर आले आहे. मुंबईत दहशतवादी संघटनेच्या संबंधित एक मोर्चा निघाला होता.त्यामध्ये याचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार सातारा शहर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी त्याच्याकडे चौकशी केली होती. चौकशी करुन त्याबाबतचा अहवालही पाठवण्यात आला असल्याचे समोर आले आहे. या सर्वप्रकारामुळे सातार्‍यात त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

No comments

Powered by Blogger.