साताऱ्यात कार्यकर्ते जामिनावर अन दोन्ही राजे कमानींवर


सातारा : कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री टोलनाक्‍यावरून दोन्ही राजांच्या समर्थकांत धुमश्‍चक्री झाली. प्रकरणात दोन्ही राजांच्या समर्थकांना जामीन मंजूर झाले आहेत. आता दोन राजांना बाबत पोलिस प्रशासन काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुळात सातारकरांचे दोन्ही राजांवर निस्सीम प्रेम आहे. त्यामुळे ते सांगतील तीच लोकशाही सातारकरांना मान्य आहे. त्यामुळे दोन्ही राजे त्यांच्यावर दाखल गुन्ह्यातून सही सलामत सुटणार अशीच सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे विविध स्वागत फलक असो की कमान येथेही या दोन्ही राजांचे स्थान भक्कम आहे.

जिल्ह्यातील महामार्गावरील टोलनाक्‍यांचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होते. गेल्या वर्षी टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय टोलनाक्‍यांची जबाबदारी असलेल्या कंपनीने घेतला. त्यानुसार खासदारांच्या समर्थकांकडून हे टोलनाके सांगलीतील एकाकडे देण्यात आले. त्यांनी हे टोलनाके आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांकडे दिले. यातून दोन राजे व त्यांच्या समर्थकांत वाद सुरू झाला.

गेल्यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दोन्ही राजें व त्यांचे समर्थक सुरूची या आमदारांच्या बंगल्यासमोर वादावादी होऊन त्यांचे पर्यवसन धुमश्‍चक्रीत झाले. यावेळी गोळीबाराचेही आवाज झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या समर्थकांना ताब्यात घेऊन खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह 200 समर्थकांवर बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी करणे, खूनाच्या प्रयत्न करणे, शस्त्र व जमावबंदी आदेशाचा भंग करणे हे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या समर्थकांचे अटक सत्र सुरू केले पण या कालावधीत दोन्ही राजे आऊटऑफ कव्हरेज राहिले. त्यामुळे समर्थकांनाच अटक झाली. त्यानंतर दोन्ही राजांच्या बाजूने त्यांच्या समर्थकांना जामीन मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

तब्बल साडे तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर दोन्ही राजांच्या समर्थकांना नियमित जामीन मंजूर झाले आहेत. आता दोन्ही राजांबाबत पोलिस प्रशासन कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारकारांचे दोन्ही राजांवर निस्सीम प्रेम आहे. या प्रेमापोटी दोन्ही राजे सांगतील तीच लोकशाही सातारकरांना मान्य आहे. आता धुमश्‍चक्री प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातून दोन्ही राजे सहिसलामत बाहेर येतील असे सर्वांनाच वाटत आहे. दोघांना अटक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यास सातारकर जनतेचा रोष पोलिसांना ओढवून घ्यावा लागेल. त्यामुळे शांततेच्या मार्गानेच पोलिस प्रशासन या दोघांबाबत राहणार हे सध्यातरी जाणवत आहे.

No comments

Powered by Blogger.