कक्ष अधिकारी विशाखा आढाव यांचा महिला बचत गटांचा कार्यक्रम यशस्वी


सोमंथळी:- फलटण तालुक्यातील महिलांचा आर्थिक विकास व्हावा , यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी विशाखा आढाव यांनी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठानच्या विद्या य. प्रे.सरमळकर यांचेशी संवाद साधला. महिलांच्या प्रश्नाबाबत सातत्याने कार्य करण्याची तळमळ असल्याने , आठवडाभर सुट्टी घेऊन त्या फलटण येथे आल्या होत्या. त्यांनी अथक परिश्रम घेउन, महिलांना संघटित करून , महिला बचत गटांचा कार्यक्रम यशस्वी केला. 
सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सातत्याने मागे राहिलेल्या महिलांना प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी, देशपातळीवर असंख्य प्रयत्न झालेले आहेत, होत आहेत. यामधूनच महिलांसाठी आरक्षण, विविध कायदे, योजना यासारख्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परंतु त्या संधी समाजातील शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या बाई पर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडलेले चित्र आपणास दिसून येते. याच गोष्टींचा विचार करून , आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने महिलांचा विकास व्हावा, त्यांना कौशल्य पूर्ण शिक्षण देऊन समाजात सन्मानाचे स्थान देऊन, महिलांना खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे सरमळकर म्हणाल्या.
तसेच फलटण तालुक्यातील महिलांना बचत गटाचे महत्त्व सांगत उद्योग करण्यासाठी प्रेरित केले. महिला स्वतःसाठी जगत नाही, महिलाही माणूस आहे , तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगून, महिलांनी उद्योग करून सामाजिक दर्जा, शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे आवाहन विशाखा आढाव यांनी केले.
या कार्यक्रमास लोणारी आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते ऊमाजी(नाना )ढेंबरे , पंचशील बचत गटाच्या अध्यक्षा -स्वाती देशपांडे व मिताली आढाव , सावित्रीबाई फुले बचतगटाच्या -उषा जगदाळे, श्रीगणेश बचतगटाच्या अर्चना पारवे व बिंदू शिंदे यांच्यासह इतर अनेक महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

No comments

Powered by Blogger.