लिंबखिंड परिसरात परप्रांतीय युवतींचा वावर


सातारा : महामार्गावर लुटमारीच्या घटना वाढल्या असतानाच परप्रांतीय पाच ते सहा युवती तोकडे कपडे घालून लिंब खिंड परिसरात फिरत असल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी याबाबत जागरुक महिलेने त्या युवतींना हटकले. मात्र, अवघ्या 10 मिनिटात त्या युवती गायब झाल्या. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दाखवलेल्या उदासिनतेबाबत गूढ निर्माण झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी अडीच वाजता राष्ट्रीय महामार्गावर लिंब खिंड पुलाखाली सातारा दिशेने निर्मनुष्य रस्त्यावरुन 15 ते 18 वर्षांच्या परप्रांतीय सहा युवती शाळकरी पोषाखात निघाल्या होत्या. युवतींच्या अंगावर शाळेचे जे कपडे होते ते तोकडे होती. यावेळी एका जागरूक महिलेने त्यांना विचारणा केली. त्यावेळी युवतींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे महिलेची शंका बळावल्याने त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आले. मात्र त्या युवती 10 मिनिटात गायब झाल्या.

राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघात व लुटमारीच्या प्रकाराने सातारकर व पोलिस त्रस्त झाले आहेत. असे असताना भर दुपारी दोन ते अडीच या कालावधीत शाळकरी पोषाखात युवतीचा गट महामार्गावर लिंब पुलाच्या आडोशाला सातारच्या दिशेने चालत निघाला होता. सध्या लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. मुलींच्या माध्यमातून अशा घटना होत असल्याची शक्यता बळावली आहे.

संबंधित महिला महामार्गावरुन बाहेर पडल्यानंतर त्या जागरुक महिलेचा काही युवकांनी पाठलाग केल्याचेही समोर आले आहे. लूटमार करणारी सराईत टोळी महामार्गाच्या बाजूला थांबवून सावज शोधताना बघितल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. याचा पोलिसांनी पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.